By देवेंद्र भुजबळ
आई-वडिलांची काळजी घेणे हे केवळ कौटुंबिक किंवा नैतिक कर्तव्य नाही, तर ती कायदेशीर जबाबदारी देखील आहे. मुलांकडून त्रास झाल्यास आई-वडील तक्रार करू शकतात आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा बातम्या वाचताना मन उदास होते. भारतातील एकत्र कुटुंबव्यवस्था कुठे हरवत चालली आहे, याची चिंता वाटते. तरीही काही ठिकाणी आशेचे किरण दिसतात आणि मन प्रसन्न होते.
असाच आशेचा किरण म्हणजे मनोज भोयर.
पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी
मनोज भोयरला उत्कृष्ट टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेबद्दल अनिलकुमार स्मृती पुरस्कार विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर येथे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि प्रेस क्लब अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
मनोज गेली २५ वर्षे पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. त्याच्या व्यावसायिक कामगिरीसोबतच त्याला विशेष बनवते ती त्याची मातृपितृभक्ती.

मातृपितृभक्त मनोज
पुरस्कार स्वीकारताना त्याच्या सोबत त्यांचे वडील – तत्वनिष्ठ, विद्यार्थीप्रिय शिक्षक भीमराव भोयर (८० वर्षे) आणि आई उपस्थित होत्या. काही वर्षांपूर्वी सिंगापूर येथे झालेल्या शब्द साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यासाठी मनोज गेला असताना वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने आई-वडिलांनाही सोबत नेले होते. विमानप्रवास आणि परदेशदर्शन घडवून आणणे हे त्याच्या आयुष्याचे वेगळे पान आहे.
मनोजच्या वडिलांनी शिक्षणक्षेत्रातील अनुभव, प्रयोग आणि विचार मांडणारे ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ हे पुस्तक लिहिले. डॉ. अभय बंग यांच्या प्रस्तावनेसह पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मनोजने मुंबई मराठी पत्रकार संघात भव्यदिव्य केले होते.
प्रेरणादायी बालपण
भीमराव भोयर यांचा जन्म वर्ध्यातील वाटखेडा गावात झाला. सेवाग्रामच्या ‘नई तालीम’ शाळेत त्यांचे शिक्षण झाले आणि गांधीवादी डॉ. अभय बंग यांच्या सहवासात त्यांनी ग्रामीण शिक्षण-आरोग्य क्षेत्रात काम केले. याच विचारांचा ठसा मनोजच्या आयुष्यात उमटला.
शिक्षक म्हणून बदली होत राहिली तरी शिक्षणात मुलांची आबाळ होऊ नये म्हणून कुटुंब वर्धा शहरात स्थायिक झाले. सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात मनोज वाढला. लहानपणापासून सभांमध्ये, शिबिरांमध्ये वडिलांसोबत फिरल्याने त्याला समाज-राजकारणाची जाण झाली आणि पत्रकारितेची आवड पक्की झाली.
पत्रकारितेतील वाटचाल
• महाविद्यालयीन जीवनात लोकमत मध्ये कॉलेज प्रतिनिधी म्हणून सुरुवात.
• सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचे शिक्षण.
• लोकमत (पुणे) पासून पुढे मुंबईत येऊन टीव्ही पत्रकारितेत प्रवेश.
• जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत डेप्युटी एडिटर (५ वर्षे) – ‘दिलखुलास’ कार्यक्रम, निवडणूक वार्तांकन.
• लोकशाही वाहिनीचा आउटपुट संपादक.
• मॅक्स महाराष्ट्र डिजिटल वाहिनीचा संपादक – ‘टू द पॉईंट’, ग्राऊंड झिरो सादरीकरण.
• २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यभर दौरे करून सामान्य माणसाचे प्रश्न मांडले.
• सहारा समय मध्ये रिपोर्टर ते ब्युरो चीफ – १० वर्षे. नक्षलवाद्यांच्या मुलाखतीपर्यंत पोहोचण्याचे धाडस.
• ईटीव्ही, न्यूज वर्ल्ड इंडिया, समय वाहिन्यांमध्ये विशेष कामगिरी.
गुजरात दंगल, मुंबई बॉम्बस्फोट, गडचिरोलीतील नक्षल चळवळ, उत्तरप्रदेश ते लेह-लडाखपर्यंत महत्त्वाच्या घटनांचे थेट वार्तांकन केले आहे.
समाजाशी नाळ
कोरोना काळात ‘टार्गेट कोरोना’ कार्यक्रमातून कोविड योद्ध्यांचे कार्य जनतेसमोर आणले.
साहित्यिक, सामाजिक, पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग.
नवोदित पत्रकारांसाठी पुणे, सोलापूर, इंदूर येथे कार्यशाळा व व्याख्याने.
पुरस्कार आणि गौरव
• नांदेड श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार
• बाबुलाल पराडकर पत्रकारिता पुरस्कार
• अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुरस्कार
• दीपस्तंभ पुरस्कार (वर्धा)
• अनिलकुमार स्मृती पुरस्कार (२०२५
नव्या पिढीला संदेश
मनोज म्हणतो –
“पत्रकारितेत येणार असाल तर या क्षेत्राची खरी आवड असली पाहिजे. फक्त ग्लॅमर पाहून हा निर्णय घेऊ नका. अभ्यास, जनसंपर्क, अडचणींवर मात करण्याची तयारी आवश्यक आहे. अन्यथा पालकांचे कष्टाचे पैसे आणि तुमची वर्षे दोन्ही वाया जातील.
पत्रकारितेची नोकरी, सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावत, आई-वडिलांना सतत साथ देणारा, मुळाशी नाळ जपणारा मनोज भोयर हा खऱ्या अर्थाने ‘पुत्र व्हावा ऐसा’ आहे.
मनोज आणि त्यांच्या परिवाराला आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखन : देवेंद्र भुजबळ
📞 ९८६९४८४८००