– नासिकेत पानसरे, मुंबई
६ मार्च २०२६. तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया — शिवजयंतीचा दिवस. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत होते. विक्रोळी कन्नमवार नगर येथील प्रभात मित्र मंडळात ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन माझ्याकडे असल्यामुळे मी त्याच्या तयारीत व्यस्त होतो.
सकाळी छत्रपती संभाजी महाराज मैदानात मॉर्निंग वॉकला गेलो. मंडळाचे सल्लागार आणि ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर यांनी विभागातील महिलांचा सत्कार शाल न देता छोटे सन्मानचिन्ह देऊन करावा, असा सल्ला दिला. विभागातील महिलांना व्हॉट्सअॅपवर आमंत्रण पाठवले होते, मात्र मला ते पुरेसे वाटले नाही. त्यामुळे मी स्वतः त्यांच्या घरी व कार्यालयात जाऊन आमंत्रण दिले. त्या धावपळीत माझ्या मोबाईलची बॅटरी संपली होती.
घरी परतल्यावर फोन चार्जिंगला लावला. त्या दिवशी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडणार होते. स्नान करून फोन सुरू केला, तर माझा मित्र व सहकारी ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांचा संदेश दिसला — “ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे यांचे साकीनाका येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.”

हा संदेश पाहून मी अवाक झालो. माझ्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. पत्नी म्हणाली, “लहान मुलासारखे का रडता?” पण माझे मन सावरत नव्हते. मी लगेच संजीवन ढेरे यांचा मुलगा प्रितेशला फोन केला. तो म्हणाला, “काका, पप्पा आत्ताच गेले. तुम्ही घरी या.”
महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ट्रॉफी तयार करायच्या होत्या. मी टागोरनगरला जाऊन त्या बनविण्याची ऑर्डर दिली आणि नंतर साकीनाका येथे संजीवनच्या घरी पोहोचलो. चटईवर शांतपणे झोपलेला त्याचा देह पाहून क्षणभर वाटले — तो उठेल आणि माझ्याशी बोलू लागेल.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून तो मणक्याच्या आजाराने आणि अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्रस्त होता. मला पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. संध्याकाळी सात वाजता अंत्ययात्रा काढण्याचे ठरले होते.
रात्री नऊच्या सुमारास त्याची अंत्ययात्रा ‘मोक्ष रथातून’ निघाली. त्याचा देह निळ्या कापडात गुंडाळलेला होता. शिवजयंती असल्याने रस्त्यांवर भगवे वातावरण होते, गुलाल उधळत मिरवणुका सुरू होत्या. त्या वातावरणात निळ्या कापडात गुंडाळलेला संजीवनचा देह पुढे सरकत होता. अनेक शिवसैनिकांनी रथ थांबवून त्याला नमस्कार केला. ते दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
संजीवन आणि मी जिवलग मित्र होतो. मंत्रालयात संजीवन ढेरे यांचे नाव घेतले जायचे तेव्हा माझेही नाव घेतले जाई. तो नेहमी म्हणायचा — “आपली ‘रे’ ची जोडी आहे. तुझ्या ‘पानसरे’मध्ये ‘रे’ आहे आणि माझ्या ‘ढेरे’मध्येही ‘रे’ आहे. ज्यांच्या आडनावात ‘रे’ असते ते क्रांती करतात.”
आमच्या पत्रकारितेची सुरुवात जवळपास एकाच काळात झाली. तो ‘श्री’ या साप्ताहिकात कामगार विषयांवर लिहित असे. एका कामगार नेत्याची मुलाखत घेताना आमची पहिली भेट झाली आणि त्यानंतर आमची मैत्री घट्ट होत गेली. नंतर आम्ही बाबूराव काणे यांच्या ‘लोकसंकेत’ वृत्तपत्रात काम केले — मी मुंबई महानगरपालिका बीट तर तो कामगार क्षेत्र कव्हर करत असे.
पुढे ‘दैनिक मुंबई संध्या’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो. माझा महानगरपालिका विषयावरील लेख आणि त्याचा कामगार विषयावरील लेख संपादकीय पानावर प्रसिद्ध होत असे. त्यानंतर त्याला ‘सामना’मध्ये मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. त्याच्या बातम्या चांगल्याच गाजल्या.
संजीवन दिलदार माणूस होता. मंत्रालयातील मित्रमंडळींसोबतचे संध्याकाळचे कार्यक्रम तोच आखायचा. आम्हाला जेवायला नेणे, टॅक्सीचे पैसे देणे, मित्रांसाठी खर्च करणे — हे त्याच्यासाठी सहज होते. शब्दाला तो कायम पक्का होता.
आज त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक मोठा आधार हरपला आहे. संजीवन, तुझ्या जाण्याने आपली मैत्री तुटली असली तरी तुझ्या आठवणी कायम जिवंत राहतील.
संजीवन मित्रा, तुला माझा निळा सलाम!
— नासिकेत पानसरे
(ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्मानित)

