By: सौ. भारती सातघरे खरे, अंबरनाथ
मित्रांनो, नाव वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल—हे काय लिहिलंय!
कारण हल्ली आपला जंगलाशी फारसा संबंध उरलेला नाही. जिकडे बघावे तिकडे सिमेंटची जंगलेच दिसतात. पण मला नेहमी वाटतं की आपल्या पिढीने मात्र, त्या मानाने, जंगलाचा प्रत्यक्ष अनुभव बऱ्यापैकी घेतलेला आहे.
लहानपणी सहलीला आम्ही जी.आय.पी. टँक (ब्रिटीशकालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे) परिसरात, काकोळ्याच्या तळ्याजवळ जायचो. तेव्हा तिकडे सगळीकडे झाडंच झाडं असायची. कुठल्यातरी दाट जंगलात आलो आहोत, असंच वाटायचं. किती बोरं मिळायची! खूप मजा यायची.
आज जंगल सफारीसाठी खास सहली आयोजित केल्या जातात. पण त्या काळी तसं काही नव्हतं. कोणतीही प्रवासी कंपनी, गाईड किंवा माहितगार नसताना जंगलात भटकण्याची, किंवा शिकारीला जाण्याची मजा काही औरच असायची. हा अनुभव मी लहानपणी अनेकदा घेतला आहे. जंगल जवळून पाहणं, निरीक्षण करणं आणि ते मनापासून अनुभवणं—हा खूपच आनंदाचा कल्लोळ असतो.
जंगलात वेगवेगळी झाडं दिसतात—पाने, फुलं, फळं; करवंदीच्या जाळ्या, सागरगोट्याची झाडं, आवळ्याची झाडं (करमरी आणि मोठे आवळे), गुंज, डिंक, खैर, निलगिरी, चंदन आणि रबराची झाडंसुद्धा. हे सगळं पाहायचं असेल, तर जंगल पाहण्याची आवड आणि पायी चालण्याची तयारी हवी. या दोन्ही गोष्टी असतील, तर तहानभूक विसरून मैलोनमैल पायपीट करत जंगलातील निसर्ग लावण्याची खरी मजा घेता येते. मी ‘निसर्ग सौंदर्य’ऐवजी ‘निसर्ग लावणं’ म्हणते—कारण ज्याला ते मनापासून अनुभवता येतं, त्यालाच त्याची खरी मजा कळते.
पळस फुलला की जणू अग्नीफुलं बहरली आहेत, असा भास होतो. नीलकुरुंजी, बांबूचा फुलोरा, गुलमोहर, बहावा—तेव्हा संपूर्ण जंगल जणू तारुण्याच्या ऐन भरात आलेलं असतं. जांभळाचा, आंब्याचा मोहोर आणि बाभळीच्या फुलांचा सुगंध तर वेड लावणारा! सारा आसमंत मंद सुवासाने दरवळत असतो आणि पावलागणिक मन मोहरून जातं. सावरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या जशा हवेत तरंगतात, तसंच मनही आनंदाने तरंगत राहतं. हे सौंदर्य शब्दातीत आहे.
कधी निलगिरीची दाट झाडं दिसतात. त्याची पानं तोडून वास घेतला की खूपच प्रसन्न वाटतं. कुठे सागवानीचं टाकी जंगल दिसतं. सागाच्या कोवळ्या पानांना हाताने चुरगळलं की मेंदीसारखा लाल भडक रंग हाताला लागतो—ते रंगलेले हात पाहताना खूप गंमत वाटते.
कधी फड्या निवडुंगाची झाडं वाटेवर दिसतात. पिवळी फुलं, हिरवी बोंडं आणि पिकलेली लालसर-जांभळी फळं—असं झाड पाहिलं की अक्षरशः वेड लागतं. जणू एखादं इंद्रधनुष्यच!
मागे दोन-तीन वेळा मी शहापूरला, माहुलीच्या डोंगरावरील जंगलात कारखान्यातल्या कारागिरांसोबत गेले होते. तिथे रानकेळीचे कंद काढायला गेलो होतो. प्रत्येक जंगलाचं सौंदर्य वेगळंच असतं. करवंदाच्या जाळ्याही भरपूर दिसल्या.
दोन वर्षांपूर्वी, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही गुहागरला गेलो होतो. कोकणात पाऊस लवकर सुरू होतो, म्हणून जंगलात शेवळ काढायला गेलो. पहिल्या पावसानंतर उगवणारी ही भाजी—आंब्याच्या झाडाखाली हमखास सापडते. आम्ही बहिणींनी तीन-चार टोपल्या भरतील इतकी शेवळ काढली. घसरड्या पायवाटांवरून चालताना पडापडी झाली, पण मजा प्रचंड आली. हाताने भाजी तोडण्याचं वेगळंच अप्रूप असतं!
लहानपणी मुरबाडच्या जंगलात शिकार पाहायला जायचो. रात्रीच्या अंधारात, अगदी आवाज न करता चालावं लागे. लाव्हरी, तीतर, रानससे, पारवे—अशा छोट्या प्राण्यांची शिकार पाहिली आणि एकदा-दोनदा केलीसुद्धा. आता मात्र याला परवानगी नाही.
जंगलात शिकारीसाठी तीक्ष्ण नजर, सावध पावलं आणि प्रचंड संयम लागतो. सुकलेल्या पालापाचोळ्याचा रंग आणि पक्ष्यांच्या पंखांचा रंग इतका सारखा असतो की पक्षी ओळखणं कठीण होतं. हा अनुभव मी सात-आठ वेळा घेतला आहे. पौर्णिमेच्या रात्री चांदण्यांचा लखलखाट आणि जंगलाचं नीरव सौंदर्य—अवर्णनीय!
केरळमध्ये निलकुरुंजी फुलताना पाहणं हा आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव होता. बारा वर्षांनी एकदा फुलणारी ही झाडं संपूर्ण डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात न्हाऊन काढतात. त्या सुवासाने मन भारावून जातं.
मुन्नारहून परतताना रानटी हत्ती रस्त्यावर आल्यामुळे दोन तास अडकलो. एक महाकाय हत्ती गाडीसमोर उभा ठाकला होता—डोळे लाल, कान टवकारलेले! सगळे जण श्वास रोखून बसलो होतो. शेवटी हत्ती जंगलात परतले आणि आम्ही सुखरूप शहरात पोहोचलो. आजही ती आठवण अंगावर काटा आणते.
महाबळेश्वरला रानगवे, गोव्यात कोल्हेकुई, भोरमध्ये ऐकलेले आवाज—जंगलात अशा असंख्य गमतीजमती अनुभवायला मिळतात.
मित्रांनो, जंगल पाहायला एक वेगळी नजर लागते. ती असेल, तरच निसर्ग आपली खरी ओळख करून देतो.

