डॉ गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! प्रचंड गरीबीला कंटाळून स्थलांतरीत झालेल्या एका कुटुंबाला रहाण्याचा परवाना मिळविण्यासाठी स्थानिक सरकारी अधिकाऱ्याला लाच द्यावी लागली. रस्त्यावर हातगाडी चालविणारे हजारो छोटे गरीब विक्रेते अशीच नियमित लाच अनेक स्थानिक अधिकाऱ्यांना देतात. अनेक असहाय्य वारांगनाही अशा बऱ्याच अधिकाऱ्यांना नियमित हफ्ता देतात. या तिन्ही समाजघटकांना आपण “अनैतिक” ठरवू शकतो का ? या असहाय्य – दुर्बळ लोकांसाठी हा एकप्रकारचा “Ethical Dilemma”च असतो जो त्यांना टाळता येत नाही. स्वतःच्या समाजात नैतिकतेच्या प्रक्रिया राबविणारे इंग्रज भारतीय उपखंडात अनैतिक राज्य करीत होते कारण अनैतिक अशाच चातुर्वर्ण्यव्यवस्थेने इथली प्रजा दुभंगलेली होती. ग्राहकांना नियमितपणे फसविणारा परंतु शाकाहारी असणारा व मद्यपान न करणारा येथील एखादा व्यापारी हा बहुदा ‘नैतिक’ ठरतो. स्वतःच्या घरात मांसाहार आणि मद्यपान करणारा परंतु ग्राहकांशी सचोटीने वागणारा व्यापारी मात्र ‘अनैतिक’ ठरवला जातो ! आणखी खोलात जाऊन तपासल्यास व सामान्य तर्क वापरल्यास असे सहजपणे लक्षात येईल की आमच्यायेथील बरेच प्राचीन साहित्याचे लेखन, प्रतिके व प्रतिमांचा वापर इ. गोष्टी उच्चभ्रू पुरुषांचे अनैतिक वर्तन नैतिक ठरविण्यासाठी केले गेले. याचे सर्वश्रुत ग्रांथिक उदाहरण म्हणजे ‘मनुस्मृती’ हा अन्यायी ग्रंथ होय. आजही काही महाभाग जेव्हा या ग्रंथाचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष समर्थन करताना दिसतात तेव्हा “सामाजिक अनैतिकते”चे दुर्दैवी दर्शन होते.
येथील काही बाबा, बापू, फादर, मौलवी आणि आचार्यांच्या अनैतिक आचरणाला लबाडीने अध्यात्माची डूब दिली गेली. अनेक पुढाऱ्यांच्या अनैतिक वर्तनाला तथाकथित जनमताची डूब मिळत राहते. अनैतिक उद्योगपती हे क्लिष्ट कायदे, सरकारी जाच व आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आवरणाखाली आपली दुष्कृत्ये झाकतात. अनैतिक प्रशासकीय अधिकारी हे पुढाऱ्यांच्या सक्तीचा धूर्त आसरा घेतात. पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील अनेक नायकांचे वर्तन हे स्रिया व शूद्रांवर अन्याय करणारे होते परंतु त्यातील काही नायकांना आम्ही देवत्व बहाल केले. अर्थात चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या उच्चभ्रू पुरुषी चौकटीनुसारच हे केले गेले. जनसामान्यांमध्ये हेतूतः नैतिकतेबद्दलचा गोंधळ माजवून अनेक देशांमध्ये पुढारी, उद्योगपती, धार्मिक दुढ्ढाचारी व प्रशासकीय अधिकारी यांची बलीष्ठ चौकडी आपला अनैतिक भोगवाद लपवत राहते. साधारणपणे नेहमीच नैतिक असणारे अनेक लोक सवडशास्राचा किंवा तथाकथित कायदेशीर चौकटीचा लबाडीने वापर करीत जेव्हा स्वतःच्या मतलबासाठी एखादे अनैतिक कृत्य करतात आणि त्याचे लंगडे समर्थनही करतात, तेव्हा नैतिक घसरण ही टप्प्याटप्प्याने वाढत जाते. आजही अनेक सुशिक्षित उच्चभ्रू स्रिया अनैतिक पुरूषी वर्चस्वाच्या रूढींविरूद्ध सोयीस्कर मौन बाळगतात. हे मौनही अनैतिकच. अनेक प्रवचनकार जेव्हा भाकड कथांचा वापर करीत भोळसट किंवा अज्ञानी श्रोत्यांसमोर अनेक अनैतिक रुढी – प्रथा – अंधश्रद्धांचे समर्थन करतात तेव्हा ते वर्तन गंभीर अध्यात्मिक अनैतिकतेचे प्रदर्शन असते. कोणत्याही संस्कृतीचा र्हास हा बहुजनांच्या भाबडेपणापेक्षा अभिजनांनी अनैतिकतेचे समर्थन केल्याने जास्त होतो. नैतिकतेच्या व्याख्येतील संदिग्धता नष्ट करण्यासाठी आपण असे म्हणू शकतो की “जे जे मानवतेविरूद्ध आहे ते ते अनैतिक होय.” इथे नैतिकतेच्या चार उतरत्या पायऱ्यांचा संक्षिप्त संदर्भ असा देता येईल – १. नैतिक व कायदेशीर २.
नैतिक परंतु बेकायदेशीर ३. कायदेशीर परंतु अनैतिक आणि ४. अनैतिक व बेकायदेशीर. ज्या समाजामध्ये “२” नंबरची परिस्थिती असते त्या समाजातील कायद्यांमध्ये मानवीय न्यायासाठीची दुरुस्ती व्हायला हवी. हल्ली मात्र आपण “३” नंबरची प्रचंड चलती आहे असे पाहतो. काही देशांमधील सरकारे आपली अनैतिक कृत्ये कायदेशीर ठरविण्यासाठी कायदेच बदलण्याचे मोठे अनैतिक कृत्य जेव्हा करतात तेव्हा समजावे की त्या देशांमधील समाजांनाच अनैतिकतेची वाळवी लागली आहे. आपल्या लाडक्या पौराणिक नायकांच्या अनैतिक वर्तनाचे लंगडे समर्थन करताना त्यांचे काही अनुयायी म्हणतात, “त्या काळात ते समर्थनीय असेल.” परंतु कोणताही अन्याय हा प्रत्येक काळात अनैतिकच असतो.
मुख्यत्वे सात प्रकारचे भ्रष्टाचार असतात – वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक (धार्मिक) व सामाजिक. यापैकी सर्वाधिक अनैतिक भ्रष्टाचार हा “वैचारिक” असतो जो बाकी सहा भ्रष्टाचारांचा निर्माता असतो. याचे ठळक उदाहरण म्हणजे चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या निर्मितीचा वैचारिक भ्रष्टाचार. तर्काने तुम्ही या सर्वाधिक अनैतिक भ्रष्टाचाराची संगती सहजपणे अन्य भ्रष्टाचारांशी लावू शकाल. दुर्दैवी गमतीचा भाग असा की नेमका हाच वैचारिक भ्रष्टाचार बहुजनांना कळत नाही कारण अनेक अनैतिक अंधश्रद्धा व अवडंबरांनी त्यांच्या मेंदूला बधीर करण्यात आले आहे. यामुळे उच्चभ्रूंचे अनेक अनैतिक व्यवहार व अधिकार हे “नियतीचा महिमा” असा मूर्ख समज बहुतांश बहुजन करुन घेतात.
बाराव्या शतकात बसवण्णा, सतराव्या शतकात तुकोबा, एकोणिसाव्या शतकात जोतिबा व आगरकर आणि विसाव्या शतकात शाहू महाराज व बाबासाहेबांनी या “उच्चभ्रू अनैतिक पुरूषी आचरणा”ची चिरफाड केली. परंतु आजही अनेक बहुजन, विशेषतः ‘इतर मागासवर्गीय’ हे या अंधश्रद्धांच्या जंजाळातून बाहेर पडलेले नाहीत. यामुळेच आजही अनेक अनैतिक सामाजिक प्रथा – परंपरांना फसव्या अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक वेष्टनात गुंडाळून बहुजनांच्या माथी मारले जाते. उदाहरणार्थ, पराक्रमी किंवा विद्वान पूर्वजांच्या असाधारण कर्तृत्वाला काही चमत्कारांच्या चौकटीत बसविण्याचा प्रकार हा अनैतिकच म्हणायला हवा, कारण या कर्तृत्वाला मग चमत्कार समजणारे अनेक बहुजन त्यातून फारसे काही शिकत नाहीत. अध्यात्मिक शक्तीचा टेंभा मिरविणारे आचार्य आणि बापू आपल्याच शिष्यांच्या कुटुंबातील अनैतिक कलह मिटवू शकत नाहीत. द्रोणाचार्यांचे “अर्थस्य पुरुषो दासः” या प्रकारातील हे अनैतिक वर्तन आजही कार्यरत आहेच.
नैतिकता अंगी बाणविण्यासाठी लहानपणापासूनच तसे निस्पृह, निर्मळ व निरपेक्ष संस्कार मुलांवर करावे लागतात. अन्यथा आपण पाहतो की आर्थिक भ्रष्टाचार न करणारे अनेकजण वैचारिक भ्रष्टाचार मात्र मोठ्या खुबीने करीत असतात. हे टाळण्यासाठी “समग्र नैतिकता” आम्हाला समजून घ्यावी लागेल. साधारणपणे समग्र नैतिकता ही पुढील सहा घटकांच्या संतुलित समुच्चयाने बनते असे आपण म्हणू शकतो – १. संवेदनशीलता २. प्रामाणिकता ३. तार्किकता ४. विवेकशीलता ५. वैश्विकता आणि ६. मानवीय सापेक्षता. या सहाही घटकांपैकी सर्वात महत्त्वाची असते ती संवेदनशीलता. आमच्या रोजच्या प्रार्थनेतही ही पूर्णपणे दिसत नाही. बहुतांश वेळा आम्ही आपल्या कुटुंबापुरतीच प्रार्थना करतो. सहावा घटक हा मानवीय सापेक्षतेचा. अत्यंत कपटी व बलाढ्य शत्रूचा पाडाव हा नैतिक साधनांनी सहसा होत नाही. अशा वेळी स्थूलमानाने अनैतिक वाटणाऱ्या साधनांचा – मार्गांचा वापर करावा लागतो. हां, ही सवय मात्र बनता कामा नये जी अंतीमतः विनाशकारी अनैतिकतेकडे घेऊन जाते.
यासाठीच सामाजिक व राजकीय नेतृत्वात प्रगल्भता आवश्यक असते. “नीतीशास्रा”चा हाच उद्देश असतो. वैश्विकतेमुळे नैतिकतेचे मोठे व भिन्न भिन्न आयाम कळतात. उदाहरणार्थ, सामाजिक संवेदनशीलतेबाबत भारतीय बहुजन खूप आघाडीवर असतात. परंतु तार्किकतेबाबत पश्चिमी देशांमधील समाज आमच्या खूप पुढे आहेत. कपील या नास्तिक मुनीने आपल्या सांख्य दर्शनातून नैतिकतेच्या व्यक्तीगत गुणांची उतरती भाजणी अशी सांगितली आहे – १. सत्वगुणी – हे मानतात की तुमची साधने ही तुमची आहेतच, पण माझीही साधने तुमचीच आहेत. २. रजोगुणी – हे म्हणतात की माझी साधने ही माझी आहेत व तुमची साधने ही तुमची आहेत. ३. तमोगुणी – यांचा आग्रह असतो की ह्यांच्या गोष्टी ह्यांच्या आहेतच, तुमच्याही गोष्टी ह्यांच्याच आहेत. वर मी नमूद केलेली बलीष्ठ अनैतिक चौकडी ही यातील तिसऱ्या प्रकारात मोडते, हे स्पष्ट आहे.
“नमन नमनमें फेर है,
बहुत नमे नादान,
दगाबाज दुगना नमे,
चित्ता, चोर, कमान”
हे एक राजस्थानी सुभाषित आहे जे ‘ढोंगी अनैतिक व्यक्तीं’चे सूक्ष्म वर्णन करते. अनैतिक मंडळी ढोंग – सोंग करण्यात पटाईत असतात. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून हे धूर्त लोक नैतिकतेची भ्रामक लक्षणे नियमितपणे मिरवतात, जसे की – १. सतत आस्तिक दिसणे २. खानपान, पेहराव व अंगावरील प्रतीके सात्विक दाखविणे ३. विशिष्ट ग्रंथांचा व आदरणीय व्यक्तींचा उठता – बसता उल्लेख करणे ४. आपण श्रद्धावान वा धार्मिक असल्याने कोणत्याही शंका उपस्थित करत नाही, याची बतावणी करणे व परंपरांचे निमूटपणे पालन करणे ५. आपण जातपात पाळत नाही असे उच्चरवाने सांगत राहणे आणि ६. अधेमधे विविध प्रकारचे दानधर्म करणे. “काय भुललासी वरलीया रंगा” असं संत चोखामेळा सांगून गेलेत पण तरीही आम्ही सावध होत नाही. अनैतिक मंडळींना ओळखण्याच्या काही सोप्या कसोट्या किंवा ठोकताळे असे सांगता येतील – १.
हे काय लपवतात ते प्रामुख्याने शोधायला हवे. २. हे प्रचंड खोटारडे असतात. खोट्याचं खरं करण्यात हे निष्णात असतात. ३. खाजगीत हे दुर्बळांशी व बलाढ्यांशी कसा व्यवहार करतात, स्वतःच्या व्यवसायात किंवा उद्योगात अथवा नोकरीत हे कसे वागतात ते खुबीने पहावे. ४. हे कोणत्या तत्वज्ञानाचे, ग्रंथांचे व नायकांचे समर्थन करतात ते तर्काने पडताळावे. ५. स्वतःच्या कंपूत, जातीसमूहात व संस्थेत हे काय बोलतात ते हुशारीने तपासावे ६. आपल्या कुटुंबियांशी व निरागसांशी यांचे रोजचे वागणे पहावे. अनितीमानांची ‘मोडस ऑपरंडी’ किंवा ‘अनैतिक कसब’ हे उतरत्या भाजणीनुसार तीन प्रकारचे असते – १.
अत्यंत कुटिल, नाटकी व धूर्त (हे साधारणपणे ओळखायला अवघड असतात. यास्तव हे खूप धोकादायक असतात. वाणी – पेहराव इ. बाह्य प्रतीके सोज्वळ दाखविणारी ही मंडळी आपले भीषण अनैतिक कार्य थंड डोक्याने करतात. यांच्या अनुयायांना मात्र वाटते की यांचे प्रत्येक कार्य हे धीरोदात्त उद्देशासाठीच केले जाते.) २. दुसऱ्या पंक्तीतले अनितीमान हे स्वतःच्या नेहमीच्या स्वार्थासाठी अनैतिक कार्य ‘दुनियादारी’ म्हणून नियमितपणे करीत राहतात, जसेकी कराची चोरी, लाच खाणे, कामचुकारपणा करणे, इतरांची संधी किंवा श्रेय हिसकावून घेणे, ग्राहकांना फसवणे, कर्मचाऱ्यांना व पुरवठादारांना पिळून काढणे, धार्मिक अवडंबरांमधून कमाई करणे इ. ३. तिसरा प्रकार हा अज्ञानी अनुयायांचा असतो जे यंत्रवत वरून आलेल्या अनैतिक आदेशांची अंमलबजावणी करीत असतात. हिप्नोटाइज झालेल्या या अनुयायांना सारासार विचारही करता येत नाही. हे साधारणपणे झुंडीने वावरत असतात.
अनितीमान नेतृत्व असणाऱ्या देशांना बाह्यशत्रू सहजपणे पराजीत करु शकतात कारण हे देश आधीच आतून पोखरलेले असतात. सर्वसाधारणपणे बहुतेक ‘धार्मिक’ देश हे वेगाने अनितीमान होत जातात कारण धर्माच्या आवरणाखाली या देशांमधील अनीतीमान चौकडी ही सुखेनैव स्वतःला अधिकाधिक बलीष्ठ बनवत जाते. धार्मिक अंधश्रद्धांनी जखडलेली, बेकारीने पीडित, गरीबीने गांजलेली, जातीपाती – वर्ण – भाषांमध्ये दुभंगलेली आणि अज्ञानामुळे न्यूनगंडाने ग्रासलेली जनता बहुसंख्यांक असूनही या अल्पसंख्य चौकडीला नेस्तनाबूत करु शकत नाही. धर्माचा आणि नैतिकतेचा तसा फारसा संबंध नसतो. समजा जगात दोनशे धर्म असतील तर प्रत्येक धर्मीयाला अन्य १९९ धर्म हे कमी नीतीमान वाटतात ! ३५०० वर्षांपूर्वी भारतात एकही धर्म नव्हता, तरीही लोक बव्हंशी नीतीमान होते. ज्या समाजात वा देशांत काही घटकांनी केलेल्या त्यागाची वेळेवर व योग्य भरपाई केली जाते, त्या समाजात अथवा देशांत नीतीमान लोकांची संख्या वाढत जाते. कायद्याने बनलेला ‘देश’ हा नीतीमान संस्कृतीने ‘राष्ट्र’ बनतो. यासाठी सर्व अनीतीचे मूळ कारण असणाऱ्या “वैचारिक भ्रष्टाचारा”वर प्रहार करायला हवेत. नैतिकता ही सर्व प्रथम सुदृढ विचारांनी ठरते. यास्तव आम्हाला खऱ्या ज्ञानाचा आग्रह धरावा लागेल !
—– डॉ. गिरीश जाखोटिया.
ईमेल –
girishjakhotiya@gmail.com
Copyright ©️ jakhotiya.com

