मुंबई : आरोग्य आणि पोषणाबाबत वाढत्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रोकोलीसाठी मुंबईत पहिली भव्य परिषद आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत पार पडणार असून, त्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नंदुर शिंगोटे गावात फील्ड भेट व लाईव्ह शेती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेची थीम “ब्रोकोली लागवडीपासून तुमच्या आरोग्यापर्यंत” अशी असून, ब्रोकोलीची लागवड, उत्पादन प्रक्रिया, फूड टेक्नॉलॉजी तसेच आरोग्यविषयक फायदे यावर सखोल चर्चा होणार आहे.
ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम, फायबर, सल्फोराफेनसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि क्लोरोफिलसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ही पोषकतत्त्वे रक्तदाब नियंत्रण, हृदयरोग, कर्करोग व मधुमेहाशी लढा देणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, दाह कमी करणे, शरीर डिटॉक्स करणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे, आतड्यांचे आरोग्य सुधारणे तसेच हाडे आणि त्वचेच्या आरोग्याला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रोकोलीमध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्मही आढळतात.
परिषदेत स्त्रीरोग तज्ज्ञांकडून महिलांच्या आरोग्यासाठी ब्रोकोलीचे विशेष फायदे यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, ब्रोकोलीला पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये कसे समाविष्ट करता येईल यावर जागरूकता मोहीम तसेच विशेष रेसिपी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ संजिव कपूर उपस्थित राहणार असून ते त्यांच्या समृद्ध पाककला अनुभवातून ब्रोकोलीचे आरोग्यदायी उपयोग सांगणार आहेत. ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही प्रदान करणार आहेत.
सुपरफूड म्हणून ब्रोकोलीच्या भविष्यातील संधी आणि बाजारपेठेवरही या परिषदेत चर्चा होणार आहे. ताज्या ब्रोकोलीव्यतिरिक्त ब्रोकोली पावडर (सूप, स्मूदी, सॉससाठी) तसेच फ्रोजन क्यूब्स (सुलभ जेवणासाठी) यांसारख्या प्रोसेस्ड उत्पादनांवरही विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे.
प्रमुख सहभागी व आकर्षणे :
• सेलिब्रिटी क्रिकेटर कृष्णमाचारी श्रीकांत – आहार व फिटनेसमध्ये ब्रोकोलीचे महत्त्व स्पष्ट करतील.
• स्पेनचे श्री. जेवियर बर्नाबेउ – ब्रोकोली क्रांतीचे अग्रणी (मुख्य पाहुणे).
• आघाडीचे शेतकरी व निर्यातदार – सह्याद्री, केनअॅग्रो, केबी एक्सपोर्ट.
• कोल्ड चेन पार्टनर्स – रिलायन्स रिटेल, अॅमेझॉन, गोफ्रेश आदी.
• सरकारी अधिकारी – भारत सरकारचे कृषी आयुक्त तसेच महाराष्ट्र सरकारच्या मार्केटिंग व एफडीए विभागांचे प्रतिनिधी.
• इन्फ्लुएंसर्स – संतोष जाधव (इंडियन फार्मर), फूड इन्फ्लुएंसर्स व ब्रोकोली लव्हर्स ग्रुप.
या ऐतिहासिक परिषदेमार्फत भारतात ब्रोकोलीला सुपरफूड म्हणून प्रस्थापित करणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, निर्यात वाढवणे, सप्लाय चेन मजबूत करणे तसेच रोजच्या भारतीय आहारात ब्रोकोलीचा अधिक समावेश करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

