By Raju Zanke
मुंबई – राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच, मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणाऱ्या भाजप-शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्ला पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना (उबाठा), पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच चार अपक्ष उमेदवार असे एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भाजप-शिवसेना महायुतीने मुंबईची सत्ता आणि महापौर पद मिळवण्याचा चंग बांधलेला आहे. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक जागा महत्त्वाची असताना वॉर्ड क्रमांक १६७ मध्ये मात्र महायुतीला उमेदवारच देता न आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजप-शिवसेना युतीमध्ये आरपीआय (आठवले गट) तसेच प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष आहेत. या वॉर्डातून महायुतीतील सहकारी पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीने शिवसेनेचे शाखाप्रमुख निलेश झंजे यांच्या पत्नी शीतल झंजे या ओबीसी महिलेला उमेदवारी दिली आहे.
झंजे यांनी या वॉर्डात पदयात्रा आणि प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला असतानाही, शिवसेना-भाजपने अद्याप त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही नेमका कोणाचा प्रचार करायचा, याबाबत संभ्रमात आहेत.
दरम्यान, झंजे यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करावी, असे पत्र शिवसेनेचे मित्र पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असून, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे समजते.

