मुंबई : मुख्यमंत्री स्वतःला “स्वप्नांचे सौदागर” म्हणवून घेत असले तरी, प्रत्यक्षात महाराष्ट्राचं वर्तमान किती काळोख आहे, याचं उत्तर ते देत नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या सलग दोन ट्वीट्समध्ये सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटलं आहे की, “प्रशासक म्हणून महापालिकेवर चार वर्षे तुम्ही थेट सत्तेत असताना नेमकं काय केलं?” हा आज महाराष्ट्राचा खरा प्रश्न आहे.
सचिन सावंत यांनी भाजपच्या २०१७ च्या जाहीरनाम्याची आठवण करून देत, ११ लाख घरांची घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचं काय झालं? असा थेट सवाल केला आहे. “यातील काही आश्वासनांची आम्ही वेळोवेळी आठवण करून देत आहोत, पण सरकारकडून आजपर्यंत ठोस उत्तर मिळालेलं नाही,” असा आरोप त्यांनी केला आहे.
तारीख देणारे मुख्यमंत्री, पण काम अपूर्ण
मुख्यमंत्री सतत तारखा जाहीर करतात, डेडलाईन सांगतात –
पण त्या कधीच पूर्ण होत नाहीत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे. “तारीखवर तारीख देणं हा आता मुख्यमंत्र्यांचा डायलॉग झाला आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
इस्टर्न फ्री वे २०१७ साली पूर्ण होणार होता, पुर्व द्रुतगती मार्ग २०१७ मध्ये जोडला जाणार होता. मग आजही ते प्रकल्प अपूर्ण का आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
”१ ट्रिलियन डॉलर महाराष्ट्र” फक्त भाषणात?
२०१९ पासून वेगवेगळ्या तारखा देत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होईल
असं सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात महाराष्ट्र अजूनही त्या ध्येयाजवळ पोहोचलेलाच नाही,
असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. “भाषणात आकडे, पण जमिनीवर शून्य काम,” अशी टीकाही त्यांनी केली.
Elevated roads कुठे गेले?
मुंबईच्या ट्रॅफिकसाठी जाहीर केलेले एलिव्हेटेड रोड्स आज कुठे आहेत? असा थेट सवाल सावंत यांनी केला आहे.
रोहिंग्या-बांगलादेशी मुद्द्यावर आकडे मागितले
मुख्यमंत्री म्हणतात की,
“बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सर्वात जास्त शोधून काढलं,”
मग त्याचे आकडे जाहीर करा,
असं आव्हान सचिन सावंत यांनी दिलं आहे. “किती लोक पकडले?
कुठे ठेवले? काय कारवाई केली?” हे सर्व तपशील सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री स्वप्नं दाखवत आहेत,
पण ती पूर्ण करत नाहीत,
असा थेट आरोप करत सचिन सावंत यांनी सरकारला ट्रॅक रेकॉर्ड जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.
“जाहीरनाम्याचं लेखाजोखा द्या,
आणि अपूर्ण आश्वासनांची जबाबदारी घ्या,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

