X: @therajkaran
जगातील सर्वाधिक दुर्दैवी पंतप्रधानांपैकी इम्रान खान हे एक असावेत. आईच्या कर्करोगाविरुद्ध लढता – लढता राजकारणात प्रवेश करून सत्ता काबीज करणारे इम्रान खान यांना सत्ता ही किती विषारी असू शकते याचा अनुभव येतो आहे. पाकिस्तानातील (Pakistan) वेगवेगळ्या न्यायालयांनी गेल्या आठवड्याभरात इम्रान खान (Imran Khan) यांना चार वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. या शिक्षा एकत्रित भोगायच्या झाल्यास ते किमान 34 वर्षे तुरुंगात राहतील इतकी त्या शिक्षेची व्याप्ती मोठी आहे.
इम्रान खान यांना झालेल्या शिक्षा सध्या पाकिस्तानातील निवडणुकांसाठी (general election in Pakistan) अतिशय स्फोटक मुद्दा ठरला आहे. नवे सरकार निवडण्यासाठी आठ फेब्रुवारीला मतदान होत असताना इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (Pakistan Tehreek -e- Insaf) पक्षाचे कंबरडे मोडून टाकण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले आहे. इम्रान हे पीटीआयचे (PTI) अध्वर्यू असल्यामुळे त्यांच्याशिवाय या पक्षाचे अस्तित्व नगण्य ठरले आहे. भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे आणि सरकारी गुप्त माहिती फोडल्या संदर्भातील एक प्रकरण आधीच इम्रान खान यांना राजकीयदृष्ट्या भोवले होते. आता त्यांचा आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी (Bushra Bibi) यांचा निकाह न्यायालयाने अवैध ठरवला आहे.
इम्रान आणि बुशरा या दोघांचाही हा तिसरा निकाह आहे. इस्लामिक कायद्यानुसार पतीला तलाक (Talaq) दिल्यानंतर पत्नीला तीन महिने दुसरा निकाह करता येत नाही. मात्र बुशरा यांनी तीन महिन्यांच्या कालावधीच्या आतच इम्रान यांच्याशी निकाह केला. हा निकाह इस्लामिक कायद्यानुसार तसेच पाकिस्तानच्या कायद्यानुसारदेखील अवैध ठरतो असा निकाल न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात कायदा मोडल्याबद्दल न्यायालयाने या दोघांनाही प्रत्येकी दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
इम्रान यांच्याशी निकाह करण्याआधी बुशरा बीबी अध्यात्मिक वैद्य होत्या. अध्यात्मिक शक्ती वापरून त्या रोगांवर उपचार करत असत. त्यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये आपल्या दुसऱ्या पतीला तलाक दिला आणि तीन महिन्यांच्या आतच इम्रान यांच्याशी निकाह केला, असे न्यायालयात सिद्ध झाले. मात्र, आपण दुसऱ्या पतीला नोव्हेंबरमध्ये नव्हे, तर ऑगस्टमध्ये तलाक दिला होता. त्यामुळे तीन महिन्यांचा बंधनकारक कालावधी पूर्ण केला आहे, असा बुशरा यांचा बचाव आहे.
इम्रान खान यांच्यावर 130 गुन्हे आहेत. त्यातील केवळ चार प्रकरणांचा निकाल आला आहे. इतर गुन्हे जमावाला भडकवल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. अर्थात, इम्रान यांची कारकीर्द काही स्वच्छ नव्हती. त्यांनी भ्रष्टाचा (corruption) केलाच नाही, असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यांनी लष्कराशी वैर घेतले ही कदाचित त्यांची राजकीय चूक असेल. पाकिस्तानच्या सत्ताकारणात लष्कर अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान आहे. त्यामुळे लष्कराशी ज्यांनी ज्यांनी वैर घेतले त्या सगळ्या नेत्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागली आहे. मात्र, लष्कराशी वैर घेताना आपले हात स्वच्छ असावेत याची काळजी इम्रान खान यांनी घेतली नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत.