नागपूर : विधान परिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सभागृहात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. डॉ. गोर्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला आणि त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करताना प्रा. शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “प्रा. राम शिंदे हे गुरुजी (सर) आहेत. त्यांनी शिस्तबद्ध व संवेदनशील पद्धतीने सभागृह चालवावे, अशी अपेक्षा आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अडीच वर्षांपासून विधान परिषद सभापती पद रिक्त होते. भाजपकडून प्रा. राम शिंदे यांनी १८ डिसेंबर रोजी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध एकही उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.