Twitter : @therajkaran
मुंबई
भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ किरीट सोमैय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दोन विश्वासू सहकाऱ्यांना खिचडी पुरवठादाराकडून कोट्यवधी रुपयांची लाच मिळाली असा दावा करून त्यांची नावे आपले मूळ तक्रार अर्जात सामील करून घ्यावी अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.
फणसाळकर यांना लिहिलेल्या पत्रात सोमैय्या यांनी दावा केला आहे की, अमोल गजानन कीर्तिकर यांना खिचडी कंत्राटदाराकडून 1 कोटी 65 लाख तर सूरज चव्हाण यांना याच कंत्राटदाराकडून 1 कोटी 20 लाख रुपयांची लाच मिळाली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आझाद मैदान पोलिस ठाण्यात या आधी नोंदवण्यात आलेल्या आपल्या तक्रारीत या दोन्ही व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.
सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर हे युवा सेनेचे पदाधिकारी असून माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. सूरज चव्हाण याधीच सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर आले आहेत. तर अमोल हे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत. खासदार कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेला आहे तर अमोल हे अजूनही उद्धव ठाकरे गटात आहेत. अमोल हे उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार असू शकतील, अशी चर्चा आहे.