X : @NalavadeAnant
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात वाट्याला आलेल्या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने अखेर मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा व धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा आ.भा.काँ.क.चे सरचिटणीस यांच्या सहीचे पत्रच दिल्लीवरून प्रदेश काँग्रेसला आले.
महायुतीच्या जागावाटपात ही जागा जरी भाजपला गेला असली तरी अद्याप त्यांना येथे उमेदवार देता आलेला नाही. परंतू काँग्रेसने येथे तगडा उमेदवार दिल्याने येथे काटे की टक्कर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसला जागावाटपात मुंबईत दोन जागा मिळाल्याने त्यांनी आज एका जागेवर आपला उमेदवार जाहीर केला असला तरी उत्तर मुंबई या भाजपच्या भक्कम गणल्या जाणाऱ्या मतदारसंघासाठी काँग्रेसला अद्याप तोडीस तोड उमेदवार मिळू शकलेला नाही.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व व पश्चिम आणि कालिना या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात ४ आमदार महायुतीचे आहेत तर वांद्रे पूर्व येथे जरी काँग्रेसचा आमदार असला तरी पक्षातून त्यांची हकालपट्टी कधीही होऊ शकते. त्यामुळे येथे वर्षा गायकवाड यांना भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. विलेपार्ले सोडले तर अन्य पाच मतदारसंघात दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय, व अन्य अल्पसंख्यांक समाजाची लक्षणीय मतदार संख्या असल्याने वर्षा गायकवाड यांच्यासाठी ती जमेची बाजू असल्याचे मानले जात आहे. कधी काळी काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येत होता. प्रसिध्द सिने अभिनेते सुनील दत्त यांनी अनेक वर्ष याच मतदारसंघातून खासदारकी आबाधित राखण्यात यश मिळवले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचीच कन्या प्रिया दत्त हीचा एक अपवाद वगळता काँग्रेसला येथे खाते उघडता आले नाही. पण आज काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करत येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच जान आणल्याचे चर्चिले जात आहे.