मुंबई : 10 कोटी खर्चून बांधलेल्या कुर्ल्यातील काजूपाडा रस्त्यावर भेगा पडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कुर्ला एल वॉर्डातील सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काजूपाडा रस्त्यावर पडलेल्या भेगांबाबत योग्य कार्यवाही करणे व संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांस पाठविलेल्या पत्रात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नमूद केले आहे की कुर्ला एल वॉर्डातील काजूपाडा रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होऊनही अल्पावधीतच त्यावर भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. हे काम गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण झालेले नसल्याचे स्पष्ट होते, ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचत आहे.
अनिल गलगली यांनी सदर कामासाठी जबाबदार संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करत मागणी केली आहे की कंत्राटदाराला काळया यादीत (Blacklist) समाविष्ट करावे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होणार नाही. तसेच संबंधित विभागास तातडीने कार्यवाहीसाठी निर्देश द्यावेत व सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा. तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून योग्य देखभालीची योजना तयार करण्यात यावी.