राज्यभरात जवळपास १२ हजार कोटींचे अतिरीक्त उत्पन्न…?
X: @NalavadeAnant
मुंबई: उद्या सोमवारी २०२४ या नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे. आज रविवारी २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देत असताना राज्यातल्या सत्तारूढ महायुती सरकारने राज्यभरातले बियर बार, पंचतारांकित हॉटेल, मद्याची दुकाने यांना कधी नव्हे ती विक्रमी सुट दिल्याने राज्याच्या उत्पादन शुल्कात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज विभागातल्या एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
फक्त एकट्या मुंबई महानगरीचा विचार केला तर तो आकडा किमान ६००० ते ७००० हजार कोटींवर जाण्याची शक्यताही या अधिकाऱ्याने वर्तविली. सन २०१९ चा ३१ डिसेंबर हा तसा कोविड लाटेतच गेला. पाठोपाठ २०२० तर पूर्णपणे लॉकडाऊन मध्येच गेले. आता राहता राहिला २०२१ हे वर्षही तसे काहीसे धास्तीचेच गेले. त्यावेळी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे होते.
पण मधल्या काळात तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून राज्याची सत्ता हस्तगत केली व मुख्यमंत्री पद पटकावले. तेंव्हापासून मग होळी असो, गणपती असो, नवरात्र वा दिवाळी किंवा मग ३१ डिसेंबर नव वर्षाची खऱ्या अर्थानं धुमधाम झाली. पण त्यातही सावध असणाऱ्या मुंबईकरांनी २०२२ चे नवंवर्ष फार सावधानतेने साजरे केले होते. आता माहोल तसा नाही.
या सरत्या वर्षात सर्वच सण कोणतीही भीडभाड न ठेवता, भीती न बाळगता प्रचंड उल्हासात साजरे झाले. त्याचीच परिणती या ३१ डिसेंबर नव वर्षाच्या पूर्वसंध्येला व २०२४ या नवीन वर्षाच्या स्वागताला सर्वत्र दिसून येत आहे. मुंबई असो वा उपनगर ते थेट ठाणे, कोणतही विदेशी दारूचे दुकान असो, बियर बार अँड रेस्टॉरंट असो वा पंचतारांकित हॉटेल, सर्वच हाऊसफुल्ल आहेत.
दारूच्या दुकानांच्या बाहेर तरं कधी काळी रेशन दुकानांच्या बाहेर जशी रांग आदल्या दिवशी लागायची, तशीच रांग लागलेली आढळून आली. त्या दुकानात सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत दारू घेऊन येणारी वाहने रिकामी होत होती. काही ठिकाणी तर दारू घेण्यावरून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. कारण गर्दीवर कोणाचाच कंट्रोल नव्हता. म्हणून कधी नव्हे ती कायदा व सुव्यवस्थाची घटना घडल्या.
पण एकंदरीतच याचा निचोड काढला असता राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, त्या विभागाच्या उत्पन्नात किमान मुंबई पुरता बोलायचे झाले तर ६ ते ७ हजार कोटींचे उत्पन्न विभागाला मिळू शकेल असा दावा केला आहे. तर राज्यभरात या एकाच दिवशी किमान १२ हजार कोटींचे उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाज या अधिकाऱ्याने वर्तविला.
चोख बंदोबस्त……
दारू पिऊन गाडी चालवण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई व ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागांच्या पोलिसांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने अतिरीक्त पोलिस बळ दिले असून मुख्यतः या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही म्हणून या दोन्ही शहरातले पोलिस दल ऍक्शन मोड वर आले आहे.