मुंबई: मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या २४ व्या द्रोणाचार्य रामाकांत आचरेकर स्मृती निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहपूर्ण सुरुवात झाली. प्रतिष्ठित पी. जे. हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
या वेळी MCA सचिव अभय हडप, संयुक्त सचिव दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य निलेश भोसले, कौशिक गोडबोले, सुरेंद्र करमळकर, तसेच ज्येष्ठ रणजीपटू आणि प्रशिक्षक, गोपाळ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्याने मैदानावर तरुण क्रिकेटपटूंच्या उत्साहाला नवे बळ मिळाले.
ही स्पर्धा चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक (CPCC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, एमएसएसएफ ट्रस्ट तिचे संचालन करत आहे. मुंबई क्रिकेट जगतात या स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा आहे, कारण ती मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी याच स्पर्धेतून आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात केली आहे आणि नंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व द्रोणाचार्य स्व. रामाकांत आचरेकर सरांचे शिष्य चंद्रकांत पंडित आणि MCA सदस्य निलेश भोसले यांनी गेल्या २४ वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून मुंबई क्रिकेटला नवे प्रतिभावंत दिले आहेत.
या वर्षी ३३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, सामने १७ ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध मैदानांवर खेळवले जाणार आहेत.
स्पर्धा दोन दिवसांच्या नॉकआउट पद्धतीने होणार असून, बांद्रा ते विरार परिसरातील नामांकित क्रिकेट क्लब आणि शाळांचे संघ यात सहभागी झाले आहेत. प्रत्येक सामन्यात खेळाडूंना शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि क्रीडास्पृहा दाखविण्याची संधी मिळणार आहे.
उद्घाटनावेळी बोलताना चंद्रकांत पंडित म्हणाले, “आचरेकर सरांच्या शिकवणीचा वारसा जपत आम्ही ही स्पर्धा सुरू ठेवत आहोत. मुंबईतील तरुण क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण मिळावे, हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.”
द्रोणाचार्य रामाकांत आचरेकर सरांच्या क्रिकेट संस्कारांचा वारसा जपत, ही स्पर्धा आजही मुंबई क्रिकेटमधील नव्या पिढीच्या घडणीत मोलाची भूमिका बजावत आहे. खेळाडूंच्या मेहनतीतून, त्यांच्या जिद्दी आणि आवडीतूनच या स्पर्धेचे खरे यश साकारते.