महाराष्ट्र ताज्या बातम्या

शून्य ते शिखर : वाटचाल केलेला वाटसरू

महाराष्ट्राच्या इतिहासाकडे अभ्यासपूर्वक पाहिले असता काही व्यक्तिमत्त्वे अशी आढळतात, ज्यांनी काळाच्या कपाळावर अमिट ठसा उमटवला आहे. शिवसेना संस्थापक व एकमेव शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व.

अशा असामान्य व्यक्ती वैचारिकदृष्ट्या कशा होत्या, हे समजून घेण्याचा प्रयत्न जितका प्रामाणिक, तितकाच तो आव्हानात्मक ठरतो. सामान्यांतून असामान्यत्वाकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असेच होते. जितके समीप जावे, तितका सूर्य अधिक तेजस्वी भासतो; पर्वत अधिक आकाशगामी वाटतो आणि सागर अधिक अंतहीन.

Image courtesy: Balasaheb Thackeray FB page

एक व्यंगचित्रकार म्हणून जीवनसंघर्षाची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांचे आयुष्य याच प्रवासाचे प्रतीक होते. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे आहे. अनेकजण त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लिहीत आहेत, आपल्याला बाळासाहेब कसे उमजले ते मांडत आहेत—हे स्वागतार्हच आहे. हे प्रयत्न पुढेही सुरू राहावेत, अशाच आमच्या शुभेच्छा.

आम्हाला मात्र विद्यार्थी दशेपासून बाळासाहेबांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. पुढे त्यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या साप्ताहिक मार्मिकमध्ये लेखन, तसेच दैनिक सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात सेवा करण्याचे भाग्य लाभले. या वाटचालीत अनुभवलेले, काहीसे उलगडलेले बाळासाहेब कसे भासले, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

Image courtesy: Balasaheb Thackeray FB page

माणूस जे पाहतो, जे त्याला टोचते, बोचते आणि सहन होत नाही—त्याविषयी तो व्यक्त होतो. बाळासाहेबांना रेषा वश होती. त्यांनी ती रेषा शब्दांत, व्यंगचित्रांत आणि विचारांतून बोलती केली.

संसाररूपी भवसागर तरण्यासाठी काही जण सरळ वाटेवरून चालतात; पण काहींच्या अंतःकरणात अस्वस्थतेचा वणवा धगधगत असतो. ते शांत राहू शकत नाहीत. ते थेट समरांगणात उडी घेतात—सर्वस्वाचा होम होईल याची तमा न बाळगता. बाळासाहेबांना प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या चिंतनशील, धारदार विचारवंत पित्याचा वैचारिक वारसा लाभला होता. प्रबोधनमधून महाराष्ट्रातील शिक्षित युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न दिसतो; संयुक्त महाराष्ट्रानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मवृत्तांतातून त्या काळाची जाणीव होते.

मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण मुंबईत मराठी माणसाचा ठसा राहणार का—हा प्रश्न त्या पिढीला अस्वस्थ करत होता. हीच अस्वस्थता बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे या बंधूंमध्येही होती. त्या अस्वस्थतेतून साप्ताहिक मार्मिकचा झेंडा रोवला गेला. लेखणी आणि कुंचल्याचा एक धगधगता प्रवास महाराष्ट्राने अनुभवला.

Image courtesy: Balasaheb Thackeray FB page

मार्मिकमधूनच शिवसेना नावाचे अग्निपात्र प्रकटले—हे सत्य आहे. हा प्रवास अचानक घडलेला नव्हता. तो विचारांचा, निरीक्षणांचा आणि समाजमनाशी प्रामाणिक संवादाचा परिणाम होता. जेव्हा शब्द अपुरे वाटू लागले, तेव्हा संघटनेची गरज निर्माण झाली. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नव्हता; तो मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा संघटित आविष्कार होता.

नव्या विचारांचा जन्म झाला की त्यांना उखडून टाकण्याचे प्रयत्न होतातच; संघर्ष अटळ ठरतो. हजारो शिवसैनिकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता दोन दशके हाल सोसले. त्या संघर्षातूनच १९९५ साली सत्तेचे शिखर गाठले गेले. दादरच्या शिवसेनाभवनाबाहेर वार्तांकन करताना ज्येष्ठ शिवसैनिकांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आजही स्मरणात आहेत.

सत्तेवर असणाऱ्यांना जनतेच्या जाणीवेचे महत्त्व किती असते, हा प्रश्न असतो; पण बाळासाहेबांना ती जाणीव शंभर टक्के होती. त्यांच्या भाषणांचा शब्दोच्चार ठोस, ठाशीव आणि अंतःकरणाला भिडणारा असे. त्यांच्या शब्दांत सजावट नव्हती, पण वजन होते. ते जे बोलत, ते आधी स्वतः जगलेले असे. म्हणूनच एखादे साधे वाक्यही हजारो मनांत खोलवर रुजत असे. तो आदेश नव्हता; तो विश्वास होता.

मराठी तरुणांच्या हाताला काम हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारणापेक्षा समाजकारण होता. आणि जेव्हा राजकारण समाजकारणावर हावी होऊ लागले, तेव्हा ते समूळ ढवळून काढण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या भाषणांचे सुदर्शनचक्र महाराष्ट्रभर फिरू लागले आणि दोन-दोन पिढ्यांची वैचारिक बांधिलकी उलथापालथ झाली.

Image courtesy: Balasaheb Thackeray FB page

“ब्राह्मण–ब्राह्मणेतर, मराठा–मराठेतर, स्पृश्य–अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा!”—या एका वाक्यातून बाळासाहेब कसे होते, हे स्पष्ट होते. हिंदुत्व मांडतानाही ते शेंडी–जानव्यात अडकलेले नव्हते, हे त्यांनी ठासून सांगितले.

विजयात उन्माद नव्हता, पराजयालाही त्यांनी उत्सवाचे रूप दिले. एकही विजय न मिळाल्यावरही पराभवाचा मेळावा घेऊन त्यांनी स्वाभिमान पेटवला.
“त्या सात शिवसैनिकांची आठवण ठेवा,” असे गर्जणारे;
“मेळावा संपण्याआधी त्यांची सुटका करा, नाहीतर लाखांचा मेळावा घेऊन येतो,” असा इशारा देणारे;
“मी जिब्राल्टरच्या खडकासारखा आहे,” असा दुर्दम्य आत्मविश्वास दाखवणारे आणि
“निघून जाईन मी अज्ञातात,” असे भावूक करणारे बाळासाहेब—हे सारे आम्ही पाहिले.

काळ्या चष्म्याच्या आडूनही थेट डोळ्यात पाहून बरंच काही सांगणारे बाळासाहेब आजही आठवतात.

बाळासाहेब गेले, आता फक्त आठवणी उरल्या—असं महाराष्ट्र कधीच म्हणणार नाही. त्यांच्या भाषणांतील विनोद आठवत हसत, संघर्ष विसरून पुन्हा संघर्षाला भिडणारा महाराष्ट्र त्यांना विसरणार नाही. बाळासाहेब हे एका काळापुरते मर्यादित नेते नव्हते; ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जाणिवेचा स्थायी भाग झाले आहेत.

या जवळून पाहिलेल्या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात