By डॉ. अभयकुमार दांडगे
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ते नांदेड विमानतळावर दाखल झाले होते.
मुख्यमंत्री येण्यासाठी विलंब होत असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. तेथे त्यांचा मोठ्या सन्मानाने सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते व भाविकांशी संवाद साधल्यानंतर ते नांदेडच्या मोदी मैदानातील मुख्य कार्यक्रमाकडे रवाना झाले.
या कार्यक्रमात त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांतून १६ मिनिटांचे अभ्यासपूर्ण भाषण केले. श्री गुरुतेग बहादूर यांच्या बलिदानाचा त्यांनी प्रभावी आणि भावपूर्ण उल्लेख केला. विशेष म्हणजे निवेदकांनी भाषणाअगोदरच दोन्ही भाषांतून मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळत संपूर्ण भाषण मराठी व हिंदीतूनच केले.
हा मराठवाड्यासाठी त्यांचा शेवटचा दौरा ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. त्याच दिवशी, म्हणजे २५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ते नांदेड विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.
अवघ्या पाच दिवसांपूर्वी नांदेडला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळील विमान दुर्घटनेत अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जातील, असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण मराठवाडा हळहळला.
विशेष म्हणजे मागील चार महिन्यांत त्यांचे मराठवाड्यात पाच दौरे झाले होते. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तेर हे गाव अजित पवार यांची सासरवाडी. त्यांच्या निधनाची बातमी समजताच धाराशिव जिल्ह्यात बंद पाळून अजितदादांना आदरांजली वाहण्यात आली.
नगरपालिका व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांनी मराठवाड्यात चांगलीच राजकीय पकड निर्माण केली होती. निवडणुकांपूर्वी मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. “राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, विकासासाठी मी कधीही तयार आहे,” असे सांगत त्यांनी अनेक नेते व पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला होता.
धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत ते लवकरच जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी येणार होते. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनात गुंतले होते. मात्र, त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, बीड, परभणी आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत शोककळा पसरली.
बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य मराठवाड्याच्या स्मरणात कायम राहील. १ जानेवारी २०२६, वर्षाच्या पहिल्याच दिवशी, त्यांनी बीडमध्ये १३६३ विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक् केले होते. केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर निसर्गाशी नाते जपण्यासाठी ३० लाखांहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली होती, ज्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
तसेच १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अहिल्यानगर–बीड रेल्वे मार्गासाठी दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी व ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये हे अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून मंजूर केले होते.
माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, विक्रम काळे, नांदेडचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे चंद्रकांत नवघरे आणि परभणीचे राजेश विटेकर यांना या घटनेने मोठा धक्का बसला. अनेक आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अश्रू अनावर होऊन रडताना दिसले.
धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे, जिथे अजित पवार जावई होते, तेथे बाजारपेठ बंद ठेवून हळहळ व्यक्त करण्यात आली. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण व राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार या अजित पवार यांच्या धर्मपत्नी. त्यामुळे तेरवासीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
अलीकडच्या काळात अजित पवारांनी मराठवाड्यातील राजकारणात विशेष रस घेतला होता. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांपासून त्यांनी प्रत्येक दौऱ्याला दिलेली वेळ आणि ठरलेली तारीख कधीही चुकवली नाही. त्यामुळे असा वेळ पाळणारा नेता अवेळी निघून जाईल, यावर मराठवाड्याचा विश्वासच बसत नाही.
“शेवटी ईश्वराचा न्याय हा अन्याय करणाराच ठरला,” अशीच भावना आज संपूर्ण मराठवाड्यातून व्यक्त होत आहे.

