मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदाच बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सर्वांसाठी खुले असून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पाहता येणार आहे.
उद्घाटन समारंभाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, जपानचे महावाणिज्य दूत कोजी यागी, तसेच संस्कृती व माहिती विषयक वाणिज्यदूत शिमादा मेगुमी उपस्थित होते.
आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, “जपान आणि भारतामधील मैत्रीपूर्ण संबंधांना सहा दशके झाली आहेत. ‘भगिनी शहर’ (Sister City) उपक्रमामुळे या नात्याला अधिक मजबुती मिळाली आहे. राणीबागेत आयोजिलेल्या बोन्साय आणि ओरिगामी प्रदर्शनातून निसर्गसौंदर्य आणि मानवी कलाविष्काराचा सुंदर संगम पाहायला मिळतो. सततच्या धावपळीतून एक क्षण निवांत काढण्यासाठी मुंबईकरांनी अवश्य भेट द्यावी.”
प्रदर्शनात विविध वृक्षांच्या मोहक, सूक्ष्म बोन्साय रूपांचे दर्शन घडविण्यात आले आहे. यात तारामणी, निलगिरी, बोधी वृक्ष, निर्गुडी, चायनीज लिंबू, चायनीज वड, नागचंपा, गुग्गुळ आणि इतर झाडांची लघुरूपे सजवली आहेत.
ओरिगामी विभागात विविध प्राणी, पक्षी, फुले, अवजारे आणि अनेक नेत्रसुखद कलाकृती केवळ कागदाच्या साहाय्याने साकारण्यात आल्या आहेत. या विभागासाठी ओरिगामी मित्रा यांचे सहकार्य लाभले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
प्रदर्शनाच्या आयोजनासाठी बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ इंडो-जॅपनिज असोसिएशन आणि ओरिगामी मित्र यांचेही योगदान लाभले आहे.

