By: महेश काळे
X: @maheshkale1857
धुळ्यातील संघ – जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लखनजी भतवाल गेले… ९१ वर्षांचे वय होते. त्यामुळे हा नश्वर देह कधीतरी सोडून जाणारच हे गृहीत असले तरी एखादा कार्यकर्ता आपल्या अंगीकृत कार्याशी, कार्यक्षेत्राशी, विचारधारेशी किती कमालीचा एकरूप होऊ शकतो याचे आदर्श उदाहरण लखनजी येणाऱ्या पिढीसाठी ठेवून गेले.
कदाचित त्या काळाची आवश्यकता म्हणून संघ- जनसंघाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी लखनजी धुळ्यापासून अगदी एका टोकाला म्हणजे शेकडो मैल असलेल्या धडगाव- अक्कलकुवा भागात कधीतरी गेले. आज सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना कदाचित हे अंतर फार विशेष वाटणार नाही. पण दळणवळणाच्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना धुळ्याहून निघून या दोन तालुक्यांमधील अत्यंत दुर्गम अशा थेट नर्मदेचा किनारा गाठून त्या ठिकाणी असलेल्या वनवासी बांधवांमध्ये मिसळणे, संपर्क करणे, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणे हे काम लखनजीनी आपल्या सहकाऱ्यांसोबत केले. एक राजकीय आवश्यकता म्हणून लखनजी या सर्व भागात गेले आणि नंतर अनेक वेळा ते जातच राहिले. कदाचित काही अंशी या जाण्यात राजकीय अपरिहार्यता असेलही पण त्यापेक्षाही लखनजींचे अस्वस्थ आणि संवेदनशील मन त्यांना या भागात सतत जाण्यासाठी प्रवृत्त करत राहिले. याचे कारण होते या भागातील वनवासी बांधवांचे अत्यंत कठीण आणि संघर्षशील असे जीवन.
लखनजी म्हणजे बाळकृष्ण रामेश्वर भतवाल. २६ ऑक्टोबर १९२६ या दिवशी जन्मलेल्या भतवालजींना तब्बल ९१ वर्षांचे परिपूर्ण आयुष्य लाभले. मात्र त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाले ते सातपुडा पर्वतरांगांमधील वनवासी बांधवांसाठी त्यांनी केलेल्या अफाट संघर्षाने आणि निरलस सेवेने! या अत्यंत दुर्गम भागात निवास करत असलेल्या हजारो भिल्ल – पावरा वनवासी बांधवांना आपला कुणी वाली आहे की नाही?, आपण खरंच माणूस आहोत का? असे अनेक प्रश्न जेव्हा सतावत होते तेव्हा लखन भतवाल नावाचा एक कार्यकर्ता या सर्व बांधवांच्या मदतीला धावून आला. त्यांच्या दृष्टीने अक्षरशः देवच! पुढच्या काळामध्ये या वनवासी समाजाने लखनजींना आपल्या निरलस प्रेमाने एवढे चिंब भिजवले की त्यांना अक्षरशः आपल्या परिवाराचा एक भाग करून टाकले. लखन भतवाल नावाची एक व्यक्ती ‘ लखा पावरा’ या नावाने कशी ओळखली जाऊ लागली आणि या भागातील भोळी भाबडी वनवासी मंडळी न्यायालयात आपल्या या लखा देवाची शपथ कशी घेऊ लागली हा अक्षरशः एका व्यक्तीच्या एका समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा सर्वोच्च परिपाक म्हणावा लागेल.
खरेतर मुंबई विद्यापीठाची बी कॉम पर्यंतची पदवी, अत्यंत सुसंपन्न परिवारात झालेला जन्म, घरची आर्थिक सुबत्ता, धुळे शहरात असलेली तीन तीन थिएटर्स अशी सर्वार्थाने संपन्नतेची समृद्ध परंपरा त्यांना लाभली होती. मात्र ही कारणे त्यांना सातपुडा पर्वतरांगांमधील वनवासी बांधवांमध्ये जाण्यापासून रोखू शकली नाहीत. भिल्ल – पावरा मंडळींना लखनजींची आणि लखनजींना या सर्व भोळ्या भाबड्या वनबंधूंची ओढ सातत्याने आकर्षित करतच राहिली. वनवासी क्षेत्रात सातत्याने जाण्यांमधूनच लखनजींच्या मनात विभिन्न प्रश्नांची एक मालिकाच उभी राहिली. मात्र त्यातही मूलभूत प्रश्न हा होता की, या सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या वनवासी बांधवांना सरकार आणि उर्वरित समाज माणूस मानतो की नाही?’
अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी लखनजी सातत्याने धडगाव – अक्कलकुवा – तळोदा भागामध्ये जातच राहिले. त्यातूनच जनसंघाची या सर्व भागातील पाळेमुळे तर घट्ट झालीच पण वनवासी क्षेत्रातील कुपोषण, अमानुष रूढी – परंपरा, धर्म परिवर्तन अशा अनेक समस्यांची जाण देखील लखनजींच्या कार्यातून समाजाला होत राहिली. लखनजी स्वतः उत्तम लेखक असल्याने नवशक्ती, साप्ताहिक विवेक अशा माध्यमातून ते सातत्याने वनवासी क्षेत्राबद्दल लिहीत राहिले. त्यातूनच वनवासी विषयाचे नुसते चिंतनच नाही तर या विविध समस्यांवर मात करण्याची देखील एक कार्यपद्धती त्यांनी हळूहळू विकसित केली. समाज प्रबोधनाच्या सोबतच त्यांनी मार्ग स्वीकारला तो संघर्षाचा. या सर्व भागांमधील वनवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक लढे केवळ उभारलेच नाही तर ते यशस्वी देखील करून दाखवले.
सुरुवातीच्या काळात गेल्यानंतरच भिल्ल – पावरा लोकांना सरकार व समाज माणूस मानतो की नाही हा प्रश्न निर्माण करणाऱ्या ज्या घटना त्यांना अस्वस्थ करून गेल्या त्यातील पहिली गोष्ट होती ती धडगाव सारख्या दुर्गम भागातील कारागृहाची! आरोपीला अटक केल्यानंतर जसे कुत्र्याला किंवा गुरांना एखाद्या झाडाला बांधून ठेवतात तसे आरोपीला एका झाडाला साखळीने त्याच्या हातात आणि पायात बेड्या घालून बांधले जात असत. ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता अटक झालेला कैदी गुलामापेक्षाही अमानुष पद्धतीला सामोरा जात होता. या पद्धतीच्या विरोधात प्रथम आवाज उठवला तो लखनजींनी. ज्या काळात फोटो काढणे तर दूरच पण एक साधी झेरॉक्स काढणे देखील महाकठीण काम होते अशा काळात लखनजींनी पत्रकार परिषद व अन्य प्रसार माध्यमांमधून या जुलमी व अमानुष पद्धतीविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी धुळे- मुंबई अशा कितीतरी खेटा मारत त्यांनी हा प्रश्न थेट विधानसभेपर्यंत उपस्थित केला होता. जगप्रसिद्ध टाईम मॅगझीनच्या मुखपृष्ठावर हा फोटो प्रकाशित झाल्याने संपूर्ण देशभरातच या अमानुष पद्धती विरोधात खळबळ माजली होती. त्यातूनच सरकारने ही प्रथा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
मुळात धडगाव – अक्कलकुवा सारख्या भागात कुठलाही शासकीय कर्मचारी जाण्यास तयार होत नसत. कारण या भागात बदली म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी शिक्षा देण्याचा प्रकार मानला जायचा. त्यामुळे या सर्व भागात काही बदल करण्याची फारशी कुणाची मानसिक तयारी देखील नसे. ही बाब लखनजींच्या लक्षात आली ती पोस्टमार्टमच्या ठिकाणावरून. या तिन्ही तालुक्यांमध्ये मिळून जवळपास ८० किलोमीटर परिसरात कुठेही पोस्टमार्टम करण्याची व्यवस्था नव्हती. त्याच्यामुळे मृतदेहाला झोळीत घेऊन इथल्या वनवासी मंडळींना स्वतःच आपल्या आप्तस्वकीयांचा मृतदेह त्याठिकाणी न्यावा लागे. या पद्धती विरुद्ध देखील लखनजींनी सरकारी दरबारी सातत्याने आवाज उठवत धडगाव येथे पोस्टमार्टमची व्यवस्था करून घेतली.
साधारण ८६- ८७ च्या दरम्यान त्यावेळच्या धुळे जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका असाच गाजला होता तो कुपोषणाच्या प्रकरणाने. अक्कलकुवा तालुक्यातील बामणी या ठिकाणी कुपोषणाने अनेक बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. ही घटना पुढे आणण्यामागे देखील लखनजींनी खूप मोठी भूमिका बजावली होती. विविध प्रसारमाध्यमे, समाज प्रबोधन, सरकारी दरबारी संघर्ष अशा अनेक माध्यमांमधून त्यांनी कुपोषणासारखी ही गंभीर समस्या समाजासमोर आणली होती. त्यातूनच या सर्व भागाच्या विकासाकडे सरकारने काही तातडीने पावले उचलल्याचे दिसते याचे खूप मोठे श्रेय लखनजी भतवाल यांच्या कार्याला जाते.
लखनजींच्या नेतृत्वाखाली जनसंघाने या सर्व भागात आपली राजकीय पाळे मुळे घट्ट रोवली होती. त्यामुळे दुर्गम भागातील पाड्यापाड्यांवर आजही जनसंघ – भाजपाचे अनेक कार्यकर्ते दिसून येतात. या सर्व परिस्थिती मागे लखनजी यांचा अफाट संपर्क, संघटन कौशल्य आणि संघर्ष कारणीभूत आहे. मात्र हे करत असताना या भागात होत असलेले धर्मांतर किंवा अक्कलकुवा भागात एका मोठ्या मदरशाच्या रूपाने उभे राहिलेले मोठे संकट या परिस्थितीकडे देखील लखनजींनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. अक्कलकुवा येथे जिहादी शक्तींकडून संघ प्रचारक यशवंत उजळंबकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलनातून लखनजींनी उभारलेल्या संघटनकार्याची कल्पना समाजाला आली होती. एक मात्र खरे आहे की सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला हा परिसर आजही आपली धर्म – संस्कृती- परंपरा टिकवून आहे. देशविघातक शक्तींना इथल्या भोळ्या- भाबड्या वनवासी बांधवांनी आजही थारा दिलेला नाही याचे सारे श्रेय लखन भतवाल यांच्यासारख्या समर्पित भावनेने कार्य केलेल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला द्यावे लागेल.
ज्या काळात वनवासींचा कुणीही वाली नव्हता, त्या अत्यंत प्रतिकूल काळात आणि विपरीत परिस्थितीत धडगाव – अक्कलकुवा मधील वनवासींच्या हक्कासाठी लखन भतवालजी लढले. वनवासी बांधवांच्या हृदयात स्थान मिळवणे तसे एवढे सहज सोपे नसते. पण लखनजींनी आपल्या परिश्रमाच्या आणि संघनिष्ठेच्या बळावर हे स्थान प्राप्त केले होते. वनवासी समाजासाठी कार्य करणारे कार्यकर्ते खूप असतात. पण त्यातील फार कमी लोकांना वनवासी बांधवांच्या हृदयात स्थान मिळते.
अर्थात असे कार्यकर्ते दुर्मिळच असतात..
ते अभावानेच जन्माला येतात..
लखनजी त्यातलेच एक होते..!!

