पाकिस्तान डायरी

पुन्हा एकदा बांगलादेश… 

pakistani diary

Pakistan Diary 

X: @Therajkaran

सुमारे 52 वर्षांपूर्वी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती आज बलुचिस्तानमध्ये होते आहे. पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान (Balochistan) असंतोषाने खदखदतो आहे. कोणाही पाकिस्तानी सैनिकाने (Pakistan Army) यावे, कोणाही बलुची नागरिकाला उचलून नावे आणि काही दिवसांनी त्या नागरिकाचा मृतदेह सापडावा, अशी येथील परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत हजारो बलुची नागरिक अशा पद्धतीने मारले गेले आहेत. 

गेल्या महिन्यात एका बलुची नागरिकाचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू (death in police custody) झाला. त्यानंतर मात्र बलुची नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी राजधानी इस्लामाबादवर हल्लाबोल करण्याचे ठरवले. शेकडो महिला आणि मुले बलुचिस्तानमधील तुरबत शहरापासून इस्लामाबादकडे (Islamabad ) चालत निघाले. कडाक्याची थंडी सोसत सुमारे सोळाशे किलोमीटरचा प्रवास या महिलांनी 26 दिवसांत पार केला. त्या गेल्या गुरुवारी इस्लामाबादच्या वेशीवर पोहोचल्या आणि राजधानीत खळबळ माजली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार (lathicharge) केला. प्रचंड थंडी असताना त्यांच्यावर थंड पाण्याचा फवारा केला. त्यांना इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आणि त्यांना अटक केली. 

या दडपशाहीचे पडसाद बलुचिस्तानात उमटले नसते तरच नवल. शुक्रवारी दिवसभर बलुचिस्तान धुमसत होते. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. अन्य तीन शहरांत कडकडीत बंद पाळण्यात आला. सिंध (Sindh) आणि पंजाब (Punjab) प्रांताकडे जाणारे महामार्ग सुमारे आठ तास रोखून धरण्यात आले. बलुची महिलांच्या या आंदोलनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानी लष्कर बलुचिस्तानात खोटे एन्काऊंटर (fake encounter) घडवून आणते. तेथील नागरिकांना निर्दयीपणाने मारहाण करून त्यांचा जीव घेतात ही बाब आता लपून राहिलेली नाही. ती अधिक ठळकपणाने जगापुढे आली आहे. 

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर (Caretaker PM Anwar Ul Haq Kakar) आणि सरन्यायाधीश काझी फैझ इसा (Qazi Faez Isa) हे दोघेही मूळ बलुचिस्तानचे आहेत. काकर दोन वर्षे बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते होते. इसा यांचा जन्म क्वेट्टा शहरात झाला. त्यांचे शिक्षणही तिथेच झाले. या दोघांच्या कार्यकाळात बलुचिस्तानची भळभळती जखम जगापुढे यावी हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे. 

बलुचिस्तान हा कधीही पाकिस्तानचा भाग नव्हता. अठराव्या शतकापर्यंत तो तीन राज्यांचा स्वतंत्र देश होता. ब्रिटिशांनी (British) आपल्या साम्राज्यविस्तारात बलुचिस्तान गिळंकृत केला आणि भारताची फाळणी केल्यानंतर बलुचिस्तान पाकिस्तानात समाविष्ट केला.  भारताच्या फाळणीनंतर बलुचिस्तानच्या तत्कालीन नेत्यांनी आपल्याला भारतात सामील करून घ्या असा आग्रह भारत सरकारकडे धरला होता. भारत सरकारने त्यांचा आग्रह धुडकावून लावला होता. बलुचिस्तान आज न्यायासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी झगडत आहे. पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीला नेटाने प्रतिकार करत आहे. अशीच परिस्थिती 1970-71 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात होती. तिथे पश्चिम पाकिस्तानविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आणि त्यातून पुढे बांगलादेश (Bangladesh) या स्वतंत्र देशाचा जन्म झाला. बलुचिस्तान नवा बांगलादेश होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे.

Also Read: ते परत आले आहेत

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते
पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही