X : @therajkaran
मुंबई – ‘अनधिकृत वृक्षतोडीसाठी यापुढे ५० हजार रुपये दंड आकारला जाईल, या संदर्भातील लेखी आदेश १५ जुलैपर्यंत घोषित केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात केली.
जिंतूरजवळील महामार्गासाठी चारशे वर्षे जुनी वडाची मोठी झाडे तोडण्यात आली, असा प्रश्न आमदार राहुल पाटील यांनी विचारला होता. मुनगंटीवार उत्तरात म्हणाले, ‘अनधिकृत वृक्षतोडीसंदर्भात १९६७ च्या कायद्याद्वारे एक हजार रुपये दंड आकारला जात असे. आज त्या १ हजार रुपयांचे मूल्य ५० पट वाढले. यापुढे अनधिकृत वृक्षतोडीला ५० हजार रुपये दंड ठोठावला जाईल. मंत्रिमंडळापुढे विषय आणून त्याचे कायद्यात रूपांतर केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले, राज्य सरकारने पुढाकार घेऊन राबवलेल्या वनीकरण (forestry) मोहिमेला चांगले यश आले आहे. महाराष्ट्रात वनेतर वृक्षाच्छादित क्षेत्रात किंवा वनेतर हरित क्षेत्रात अडीच हजार चौरस किलोमीटरने वाढ झाली. सरकारी प्रयत्नांना सर्वच आमदारांनी तसेच जनतेने साथ दिल्याने हरित क्षेत्र वाढले.
‘खासगी भूमीतील वृक्षतोडीसंदर्भात (tree cutting) एखाद्या व्यक्तीने विहित नमून्यात अनुमती मागितल्यास त्या संदर्भात विहित कालावधीत निर्णय देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित अधिकार्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल. या संदर्भातील वटहुकूम येत्या आठवड्यात काढू’, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केले.