X : @therajkaran
मुंबई : सभागृहाने दिलेले निर्देश त्यांना कमी वाटत असतील, तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांनी आज मुंबादेवी मंदिराच्या दर्शनी भागात सुरू असलेल्या बांधकाम संदर्भात दिले.
भाजप सदस्य अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. हे बांधकाम त्वरीत थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेले असताना, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी काम सुरू ठेवल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. मुंबादेवी मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे, असे असताना तेथे पूर्वी पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर मल्टिस्टोरी पार्किंग पार्क (Multi-storey Parking Park) उभे करण्याचे काम मुंबई पालिकेने हाती घेतले आहे. यामुळे मुंबादेवी मंदिराचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. परिणामी भाविकांमध्ये असंतोष आहे.
विधानसभेत याआधी विषय चर्चेला आला, तेव्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काम तात्काळ थांबण्याचे आदेश दिले होते. मात्र, काम आजही सुरू आहे. कंत्राटदार आणि अधिकारी संगनमत करून सभागृहाचा अवमान करत आहेत, असेही भातखळकर म्हणाले.
अध्यक्ष नार्वेकर नाराजी व्यक्त करताना म्हणाले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासंदर्भात उच्च स्तरावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे काम थांबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेले होते. तरी अधिकाऱ्यांनी, महापालिकेच्या आयुक्तांनी काम सुरू ठेवले. या सभागृहाने दिलेले निर्देश त्यांना कमी वाटत असतील, तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी. विकास आराखड्यात संबंधित जागेवर पार्किंसाठी जागा दाखवलेली नाही. याचा अर्थ एखाद्या कंत्राटदाराचा फायदा करून देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करीत असतील, तर त्यांच्यावरही सक्त कारवाई व्हावी. संबंधित काम त्वरीत थांबविण्यात यावे आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
संबंधित विभागाला याबाबत माहिती देऊन पाच वाजेपर्यंत कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. त्याचा अहवाल सभागृहात सादर केला जाईल. अध्यक्षांच्या निर्देशांचा भंग केला जात असेल, तर शासन पातळीवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यानंतर दिले.