मुंबई –आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने ५,२०० जादा बसेस सोडून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांना सुरक्षितरीत्या विठ्ठल दर्शन घडविले. या सेवेमुळे एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
३ ते १० जुलै या कालावधीत एसटीने एकूण २१,४९९ फेऱ्या केल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाचे उत्पन्न ६ कोटी ९६ लाख रुपयांनी वाढले आहे. सन २०२४ मध्ये याच यात्रेतून मिळालेले एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये होते.
“भाविकांची सुखरूप ने-आण करणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आणि अधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या परिश्रमामुळेच ही सेवा यशस्वी झाली,” असे गौरवोद्गार मंत्री सरनाईक यांनी यावेळी काढले.
हजारो एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था
यात्रेच्या काळात पंढरपूरमध्ये सेवेत असलेल्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांसाठी ५, ६ व ७ जुलै रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वखर्चातून मोफत जेवण व चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.