ताज्या बातम्या मुंबई विश्लेषण

Assembly Election : भाजप देणार चौघांना नारळ; घाटकोपर पश्चिमेतून निष्ठावंतांना तिकीट मिळेल का? 

X : @vivekbhavsar

मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Assembly election) भारतीय जनता पक्ष (BJP) मुंबईतील काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार आहे. यात प्रामुख्याने तीन नावे चर्चेत आहेत. या तीन मध्ये तमिळ सेल्वन, पराग शहा आणि राम कदम या तीन आमदारांचा समावेश आहे. या तीन ठिकाणी पर्याय उमेदवार कोण असेल याबाबत भाजपने स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून राम कदम यांचे तिकीट कापल्यावर कोणाला उमेदवारी मिळेल याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. या मतदारसंघात तिघांनी दावा केला आहे. 

महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २२ ऑक्टोबर पासून नामांकन पत्र दाखल करण्यास सुरुवात होईल. महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांकडूनही अधिकृत उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. काँग्रेसने कालच स्पष्ट केले आहे की २८८ पैकी २६० जागांवर महाविकास आघाडीत एकमत झालेले आहे. मात्र महायुतीकडून अद्याप तसे कुठलेही स्पष्ट संकेत नाहीत. 

महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजूनही अनेक जागांवर एकमत झालेले नाही. भाजपच्या असंख्य विद्यमान मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांनी दावा केल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरू आहे. याचा फैसला करण्यासाठीच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाऊन दुसऱ्यांदा अमित शहा यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

भारतीय जनता पक्षाची पहिली यादी आज संध्याकाळी किंवा शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत विद्यमान ५० आमदारांचा समावेश असेल. या जागा अशा असतील की ज्या जिंकून येण्याची भाजपला खात्री आहे. उर्वरित सुमारे १०० जागांवर अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊनच भाजपा उमेदवारी देणार आहे. 

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ २३ वरून ९ असे घटले. भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या मतदारसंघात तसेच काही आमदारांच्या मतदारसंघात भाजप पिछाडीवर राहिली आणि त्याचाच विचार करून यावेळी काही आमदारांना पक्ष कार्याला जुंपून नवीन चेहरा देण्याचा विचार भाजपा करत आहे. 

मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व मतदार संघातून निवडून आले. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असलेले भाजपचे राम कदम आणि घाटकोपर पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार पराग शहा यांनी लोकसभेत पक्षाचं काम केलं नाही, असा त्यांच्यावर ठपका आहे. याच कारणामुळे या दोघांचीही उमेदवारी यावेळी कापली जाईल आणि त्या ठिकाणी अन्य पर्याय देण्यात येणार आहे. 

भाजपकडून मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर पूर्व मतदार संघातून माजी मंत्री प्रकाश मेहता यांना पुन्हा तिकीट दिले जाईल. एका फाईलवर मुख्यमंत्र्यांची परस्पर सही करून प्रकरण मंजूर केल्याचा आरोप प्रकाश मेहता यांच्यावर झाला होता आणि त्यातून त्यांचा राजीनामा घेतला गेला होता. याच कारणामुळे नेता यांना २०१९ मध्ये तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र पराग शाह यांना राजकीय शिक्षा देणे आणि प्रकाश मेहता यांचे राजकीय पुनर्वसन करणे याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सायन कोळीवाडा मतदार संघात विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांनी देखील पक्षाचे काम न केल्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार आहे. त्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांचे तिकीट कापून त्यांच्या ऐवजी गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिले जाणार आहे. शेट्टी यांनी यापूर्वी प्रत्येकी दोन वेळा बोरीवली विधानसभेचे तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. गोयल या मतदारसंघातून निवडून आले. या त्यागाचं फळ म्हणून गोपाळ शेट्टी यांना बोरिवलीतून पुन्हा विधानसभेचे तिकीट दिले जाणार आहे. 

घाटकोपर पश्चिम मतदार संघात राम कदम यांचे तिकीट कापून त्यांच्या ऐवजी प्रवीण छेडा किंवा अवधूत वाघ या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. प्रवीण छेडा यांचा काँग्रेस आणि भाजप असा वारंवार प्रवास झाला आहे. त्यामुळे छेडा यांच्यावर दलबदलुचा शिक्का आहे. तर अवधूत वाघ हे देखील पूर्वी मनसेमध्ये होते. मात्र गेले अनेक वर्ष ते भाजपसोबत असून भाजपच्या प्रवक्तेपदाच्या भूमिकेतून विरोधकांवर तुटून पडण्याचे काम करत आहेत.

विलेपार्ले मतदारसंघातून विद्यमान आमदार पराग अळवणी यांचे देखील तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे निवडणुक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचे भाजपच्या सूत्राने सांगितले. मतदारसंघ बदलणे म्हणजे लढण्यापूर्वीच पराभव पत्करला असे होईल, शिवाय शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असल्याने शेलारांचा कुठलाही निर्णय पक्षाच्या अन्य मतदारसंघावर होईल, त्यामुळे शेलार असा निर्णय घेणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

आशिष शेलार यांनी आतापर्यंत मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजात चांगले संबंध टिकून ठेवले होते. त्या बळावरच आशिष शेलार बांद्रा पश्चिम मतदार संघातून निवडून येत होते. मात्र यंदा हाच मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज शेलार यांच्याविरोधात गेला आहे. त्यामुळे शेलार सुरक्षित मतदार संघ शोधत असल्याची चर्चा असली तरी त्यात तथ्य नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी