@vivekbhavsar
मुंबई
मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना जणू काही आरोपमुक्त केले आहे, अशा अविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर दावे – प्रतिदावे करणे सुरू केले आहे. मात्र, दीड वर्ष कोठडीत घालवलेल्या नवाब मलिक यांना सत्ताधारी भाजपाशी जुळवून घेण्याशिवाय म्हणजेच अजित पवार यांच्या गटात जाण्याशिवाय पर्याय नसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांना फोडल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आणि वर्चस्व वाढणार नाही, या धोरणावर चालणाऱ्या भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना गळाला लावले. जे सोबत आले नाहीत, त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांच्या चौकशी लावल्या. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे त्यातीलच काही मोहरे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक रोज भारतीय जनता पक्षावर आक्रमकपणे तुटून पडत होते. जोपर्यंत ते भाजपावर टीका करत होते, तोपर्यंत सगळे काही अलबेल होते. मात्र, ज्या दिवशी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या संदर्भातील एका गाण्यावर आक्षेपार्ह टिपणी केली, त्याच दिवशी मलिक हे देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आले होते. तोपर्यंत मलिक यांच्या आरोपांना भाजपातील वेगवेगळे प्रवक्ते उत्तर देत असत. मात्र, अमृता फडणवीस यांचे नाव आल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा बुरखा फाडला होता, मलिक यांनी दाऊद इब्राहीमची मालमत्ता खरेदी केल्याचा दावा केला होता. त्याच दिवशी नवाब मलिक ‘आत’ जातील, याची कुणकुण सगळ्यांनाच लागली होती.
64 वर्षीय नवाब मलिकांनी जवळपास दीड वर्ष इडीची कोठडी किंवा रुग्णालयात काढले आहेत. वयाच्या साठीनंतर कुठल्याही नेत्याला कोठडीत राहण्याची हौस नसते, म्हणूनच तो भाजपमध्ये येण्याचा पर्याय स्वीकारतो, हे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचं ‘ऑफ द रेकॉर्ड’ वक्तव्य खूप काही सांगणारे आहे.
त्यामुळे जामिनावर सुटलेले नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत जातील, भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांचे शुद्धीकरण केले जाऊन मंत्रीपदही बहाल केले जावू शकते. शरद पवार यांच्यासोबत राहण्यात नवाब मलिकांचे नुकसानच होणार आहे. गेल्या काही दिवसातील घटनाक्रमाकडे बघितल्यास हा तर्क योग्य असेल, असे म्हणता येईल. एका किडनीवरही मनुष्याला जगता येते, असा दावा करून नवाब मलिकांना जामीन देण्यास विरोध करणारी इडी नंतरच्या सुनावणीमध्ये जामीनावर आक्षेप घेत नाही, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरलेले आहे. नवाब मलिक यांनाही उपचाराच्या नावाखाली रुग्णालयाऐवजी पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यामागे कुठल्या राजकीय पक्षाची मेहरबानी असेल? याचे उत्तर सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही.