समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या महायुती सरकारने मराठा समाजासाठीही उत्तम प्रकारे काम केले असून समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ‘मराठा समाज टाका पाऊल प्रगतीचे’ या पुस्तिकेतून जनतेला फडणवीस सरकारने व महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची उपयुक्त माहिती मिळेल, असा विश्वास भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी मंगळवारी येथे पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी ‘मराठा समाज टाका पाऊल प्रगतीचे’ या पुस्तिकेचे प्रकाशनही आ. दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन हे यावेळी उपस्थित होते.
आ.दरेकर यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाअंतर्गत (एसईबीसी) आरक्षण लागू केल्याने त्याचा त्या काळात मराठा तरुण तरुणींना शिक्षण व प्रशासकीय सेवेत प्रत्यक्ष लाभ झाला.शैक्षणिक प्रवेश आणि सुमारे २४०० डॉक्टर झाले.२०१८ ते २०२१ या काळात आरक्षण लागू असलेल्या तसेच २०२४ मध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेत कायमस्वरूपी लागलेल्या मराठा समाजातील उमेदवारांची संख्या सुमारे आठ हजार आहे.
२०२४ मध्ये झालेल्या पोलीस भरतीत एसइबीसी मधून ८६७ पोलीस भरती झाली.सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाअंतर्गत दिल्या गेलेल्या मराठा आरक्षणास ९ सप्टेंबर २०२० रोजी स्थगिती येण्यापूर्वी निवड झालेल्या परंतु नियुक्ती न मिळालेल्या सुमारे ३७०० वंचित उमेदवारांना सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदाचा कायदा करून नियुक्त्या करण्यात आल्याचा दावाही आ.दरेकर यांनी यावेळी केला.