नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार, बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या निर्घृण हत्येसह खंडणी वसुलीच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणांवर एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) चौकशी होईल, तसेच बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची तातडीने बदली केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले, “परभणी पुतळा तोडफोड प्रकरणातील आरोपी दत्तराव सोपानराव पवार हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर २०१० पासून उपचार सुरू होते. या घटनेचा संबंध त्या दिवशी निघालेल्या सकल हिंदू समाज मोर्चाशी नाही. पवार याने मोर्चा संपल्यानंतर पाच तासांनी पुतळ्याची तोडफोड केली. परिणामी शहरात वातावरण बिघडले. काही आंदोलकांच्या हिंसक वागण्यामुळे पोलीस कारवाई झाली, आणि व्हिडिओतील पुराव्यांच्या आधारावरच संबंधितांवर कारवाई करण्यात आली.”
मुख्यमंत्र्यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोडमान यांच्यावर अतिबळ वापर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई जाहीर केली. तसेच परभणी घटनेतील कोठडीत मृत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला आधीपासूनच श्वसनाचा आजार असल्याचे सांगण्यात आले.
बीड सरपंच हत्या प्रकरण:
मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष अप्पा देशमुख यांच्या निर्घृण हत्येबद्दल सांगितले की, “आवाडा ग्रीन एनर्जी प्रकल्पातून खंडणी वसूलीला विरोध केल्यामुळे देशमुख यांचे अपहरण करून त्यांना अमानुष मारहाणीत ठार मारले गेले. या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले असून, या घटनेचा संबंध परभणी घटनेशी आहे का, याचाही तपास केला जाईल. दोषींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मपोका) कठोर कारवाई केली जाईल.”
सरपंच देशमुख व कोठडीत मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षांना सभागृहात बोलण्याची परवानगी न मिळाल्याने संतप्त सदस्यांनी सभात्याग केला.