मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशात एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा घटक पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने लक्षणीय यश देत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्षविस्ताराची प्रक्रिया जोमाने सुरू राहील आणि कोणतीही कसूर होणार नाही, असे स्पष्ट मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी नगर अधिवेशनात पाच वर्षांचा रोडमॅप जाहीर
पक्षाच्या आगामी अधिवेशनात राज्यभरात पक्ष विस्ताराचा पाच वर्षांचा रोड मॅप जाहीर केला जाणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.
पवार घराणे एकत्र यावे, पण राजकारण वेगळे – तटकरे
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी पवार घराणे एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या बाबी आहेत.”
भुजबळ पक्षातच राहतील – लवकरच चर्चा
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षवाढीसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. दोन दिवसांत भुजबळ यांच्याशी चर्चा करून ते पक्षासोबत राहतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा – तटकरे
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावर भाष्य करताना तटकरे म्हणाले की, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि कोणाचीही गय होऊ नये, ही पक्षाची भूमिका आहे. पालकमंत्री नियुक्तीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र चर्चा करून निर्णय घेतील. दोन दिवसांत पालकमंत्री नियुक्तीची घोषणा अपेक्षित असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
बजरंग सोनवणे यांचा आरोप फेटाळला
वाल्मिक कराड याच्या समर्पणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडी उपस्थित होती, या खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपाचे खंडन करताना तटकरे म्हणाले की, सोनवणे यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा गाडीचा नंबर द्यावा.
“गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत,” असे सांगत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा निर्धार व्यक्त केला.