पुणे : महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री दावोस येथे होणाऱ्या जागतिक अर्थ परिषदेत सहभागी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी केलेल्या करारांपैकी बहुतांश कंपन्या भारतीय असल्याचे दिसत आहे. भारतीय कंपन्यांशी दावोस येथे करार करण्याऐवजी गुजरातमधील ‘व्हायब्रंट गुजरात’च्या धर्तीवर पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम आयोजित करावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह
माने म्हणाले, “महाराष्ट्र सध्या आर्थिक संकटात आहे. राज्य सरकारने २०२३-२४ मध्ये ८२,०४३ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याने कर्जाचा बोजा ७.११ लाख कोटींवर गेला आहे. या वाढत्या कर्जामुळे विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावर मोठा परिणाम झाला आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांमुळे ९६,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार निर्माण होणार आहे, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसू शकतो.”
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याची कबुली दिली आहे. पुढील पाच वर्षे काटेकोर आर्थिक नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगितल्याचे माने यांनी नमूद केले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “राज्याला दावोस दौरा परवडण्यासारखा आहे का? सरकारने याचा विचार करायला हवा.”
पुण्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र होण्याची गरज
माने पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात रोजगार वाढीसाठी परकीय गुंतवणूक आवश्यक आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र, दावोस येथे भारतीय कंपन्यांशी करार करण्याऐवजी हे करार मुंबई किंवा पुण्यात करता येतील. कारण या कंपन्या आधीच महाराष्ट्रात येण्यासाठी तयार असतात. त्यामुळे पुढील वर्षी राज्य सरकारने पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारखा कार्यक्रम आयोजित करावा.
गुजरातमध्ये दरवर्षी ‘व्हायब्रंट गुजरात’ नावाचा भव्य कार्यक्रम होतो, ज्यामध्ये जागतिक गुंतवणूकदार सहभागी होतात. महाराष्ट्रात मात्र ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ मोहिमेला तुलनेने कमी प्राधान्य दिले जात आहे. “गुजरातमधील गुंतवणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ मोहीम मागे टाकण्यात आली का?” असा सवालही माने यांनी उपस्थित केला.
गुंतवणुकीच्या धोरणात आक्रमकता हवी
“मुख्यमंत्र्यांनी आक्रमक धोरण राबवून महाराष्ट्रात खऱ्या परकीय गुंतवणुकीसाठी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांना या कामासाठी पाठिंबा देऊ. मात्र, मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखा भव्य कार्यक्रम सुरू करून राज्याला अधिक गुंतवणूक कशी मिळेल, यावर काम होणे आवश्यक आहे,” असे आवाहनही माने यांनी केले.