मुंबई: परळी तालुक्यातील नंदागौळ गावचे सुपुत्र भरत गीते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र शासनाशी दोन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांद्वारे सुपा आणि अहिल्यानगर येथे अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन्स तयार करून जागतिक स्तरावर निर्यात केली जाणार आहे.
या प्रकल्पांसाठी ₹500 कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार असून, 1200 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भरत गीते आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. त्यांनी हा परळीकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत.
भरत गीते यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीने परळी तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर नेल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.