राज्यातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाला पर्यटनातून उजाळा मिळणार
डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेवर विचार करण्याची केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचवावा, यासाठी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
डॉ. शिंदे यांनी आज लोकसभेत महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पर्यटनवाढीबाबत मुद्दा उपस्थित केला. या संकल्पनेचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली.
गड-किल्ल्यांसाठी विशेष पर्यटन सर्किटची मागणी
लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील पर्यटनवाढीच्या अनुषंगाने प्रश्न मांडला. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्रात कोस्टल सर्किट आणि स्पिरिच्युअल सर्किटसाठी आर्थिक सहाय्य केले आहे. त्याच धर्तीवर ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील रायगड, राजगड, सिंहगड, शिवनेरी यांसारखे ऐतिहासिक गड केवळ इतिहासाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. ज्या प्रकारे स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून अन्य ठिकाणी पर्यटन सर्किट्स विकसित केली जात आहेत, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना जोडून एक भव्य ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ उभारले जावे. त्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्यास पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव मिळेल, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.”
महाराष्ट्रासाठी आधीच्या प्रकल्पांसाठी दिलेल्या मदतीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत खासदार डॉ. शिंदे यांनी गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र टुरिझम सर्किटची मागणी लावून धरली.
केंद्र सरकार सकारात्मक
यावर प्रतिसाद देताना केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील ऐतिहासिक वारशांचे जतन व संवर्धन करण्यास कटिबद्ध आहे. नुकतेच पुण्यातील ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्कला केंद्र सरकारने मान्यता दिली असून, या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० कोटी आणि केंद्राने ७६ कोटी रुपयांचे सहाय्य दिले आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर अंडरवॉटर म्युझियमसाठी ४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.”
मंत्री शेखावत यांनी पुढे माहिती दिली की, भारताच्या नौसेना ध्वजाची प्रेरणाही छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली गेली आहे. तसेच महाराष्ट्र व तामिळनाडूतील गड-किल्ल्यांची संयुक्त यादी वर्ल्ड हेरिटेज कमिटीसमोर सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यात गड-किल्ल्यांच्या पर्यटनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
अन्य प्रलंबित प्रकल्पांबाबतही प्रश्न
खासदार डॉ. शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर १२२ कोटी व छत्रपती संभाजीनगरमधील हेरिटेज कॉरिडॉरसाठी प्रस्तावित १३२ कोटींच्या निधीचा विषयही लोकसभेत उपस्थित केला.
“छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक पर्यटन क्षेत्रांचे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून रूपांतर करण्यासाठी १३२ कोटी रुपये अद्याप मंजूर झालेले नाहीत. हेरिटेज कॉरिडॉरचा मास्टर प्लॅन, कोयना नगर गार्डन डेव्हलपमेंट आणि कोयना बॅकवॉटरच्या विकासाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी कधी मिळेल?” असा सवालही त्यांनी केला.
यावर मंत्री शेखावत यांनी “पर्यटनवाढीच्या प्रस्तावांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन दिले.