मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी मतांसाठी मोठमोठ्या योजना जाहीर करणाऱ्या महायुती सरकारने सत्ता आल्यानंतर त्या योजनाच बंद करण्यास सुरुवात केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे केला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यासारख्या योजना बंद करण्याच्या तयारीत असून, सत्ता मिळाल्यानंतर सरकारला अचानक तिजोरीची आठवण झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर तोफ डागली.
‘लाडकी बहिण’ योजनेतील अटींवर टीका
वडेट्टीवार म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी सरकारने मतांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या, तेव्हा तिजोरीकडे पाहिले नाही. मात्र आता सत्ता आल्यानंतर योजना बंद केल्या जात आहेत. ‘लाडकी बहिण’ योजनेतही कठोर अटी-शर्ती लावून लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा घाट घातला जात आहे.” त्यांनी सरकारवर लोकांना आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून सत्ता मिळवल्याचाही थेट आरोप केला.
परभणी हत्याकांडावरून भाजपवर हल्लाबोल
परभणीतील एका दलित व्यक्तीच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करू नका, माफ करा, अशी भूमिका घेतली. यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, “हे पूर्णपणे दुटप्पी धोरण आहे. एका दलित व्यक्तीची हत्या होते, तेव्हा गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांना संरक्षण देण्याची भाषा केली जाते. हे जातीय तणाव वाढवणारे असून, कोणीही दोषी असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. मात्र, सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, असा परखड सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
“निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावं घेऊन मतं मागायची, पण सत्ता आल्यावर त्यांच्या अपमान करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करायची नाही, हे महायुती सरकारचे दुटप्पी धोरण आहे.” त्यांनी पुढे विचारले, “सोलापूरकर कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत? ते इतिहासकार नाहीत, मग अशा वक्तव्यांमागे कोण आहे? याचा सरकारने सखोल तपास करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.”
“जनता महायुती सरकारला धडा शिकवेल!”
वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून टीका करत “महायुती सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मतांसाठी घोषणा करायच्या आणि सत्ता आल्यानंतर त्या योजनाच बंद करायच्या – हा प्रकार लबाडीचा आहे. मात्र, गाजर दाखवून सत्ता मिळवणाऱ्या सरकारला जनता लवकरच धडा शिकवेल,” असा इशारा दिला.