मुंबई: भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींवर आलेल्या संकटावरून शेलार यांनी ठाकरेंवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आहे.
ट्विटरवर (एक्स) पोस्ट करताना शेलार म्हणाले, “आज गणेश मूर्तींच्या अडचणींवर आदित्य ठाकरे गप्प आहेत का? कारण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव बंद पडावा, लालबागच्या राजाची परंपरा खंडित व्हावी यासाठीच प्रयत्न केले होते.”
श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2025
◆ आज माघी गणेशोत्सवातील पिओपीच्या गणेश मुर्त्या अडचणीत आलायत, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना?
◆ कारण यांचे पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव…
शेलार यांनी पुढे सांगितले की, “गणेशोत्सव असो वा दहीहंडी, हिंदूंच्या सण-उत्सवांवर संकट आले, तेव्हा ठाकरे गट न्यायालयात कधीच गेला नाही, आजही जाणार असेही सांगत नाहीत.”
शेलार यांनी ठाकरे गटावर हिंदूविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करताना लिहिले, “हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांचा त्रास होतो, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाला हात लावत नाहीत. अजान स्पर्धा भरवतात आणि भोंग्यांचा आवाज सुमधुर वाटतो. गणपतीची आरती हातात घ्यायला टाळाटाळ करणारे आता गणेशोत्सवावर बोलताहेत?”
आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष ढोंगी भक्त असल्याचा आरोप करताना शेलार यांनी लिहिले, “हे ढोंगी, स्वार्थी भक्त आज गणपती बाप्पाची आरती करीत आहेत, पण ते म्हणजे ढोंग, ढोंग आणि फक्त ढोंग! महाराष्ट्रातील गणेशभक्त यांच्यापासून सावध झालेच आहेत, आता गणपती बाप्पानेही हे ढोंगी रूप पाहावे.”
भाजप नेत्यांकडून यापूर्वीही ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विशेषतः हिंदू उत्सव, मंदिरे, आणि अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने घेतलेल्या भूमिकांवर सातत्याने टीका होत आहे.