मुंबई: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा २१ जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ प्रतिष्ठेचे रेडिओ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता पार पडणार आहे.
रेडिओ क्षेत्राला मिळणार सन्मान
मंत्री शेलार म्हणाले, “रेडिओ हे केवळ मनोरंजनाचे नव्हे, तर प्रबोधन, सामाजिक जाणीवा, आणि सांस्कृतिक वारसा जपणारे प्रभावी माध्यम आहे. यामाध्यमातून अनेक कलावंत घडले असून, मराठी भाषा, संगीत आणि साहित्याचे संवर्धन करण्यात रेडिओचा मोठा वाटा आहे.”
रेडिओच्या माध्यमातून काम करणाऱ्या कलाकार, निवेदक, संगीतकार, लेखक, संपादक व तंत्रज्ञ यांना व्यासपीठ मिळावे, त्यांचे योगदान गौरवावे यासाठी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’
प्रसिद्ध गायिका आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या आशा भोसले यांच्या नावाने मुख्य गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव “आशा रेडिओ गौरव पुरस्कार” असे ठेवण्यात आले आहे.
एकूण १२ पुरस्कारांचे वितरण
नामांकनाच्या आधारे पुढील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत:
• महाराष्ट्र आशा सर्वोत्तम रेडिओ केंद्र
• महाराष्ट्र आशा सर्वोत्तम कम्युनिटी रेडिओ
• सर्वोत्तम रेडिओ मनोरंजन/सामाजिक कार्यक्रम
• सर्वोत्तम पुरुष/महिला निवेदक
• सर्वोत्तम नवोदित आणि मराठी निवेदक
• सामाजिक उत्तरदायित्व भान असलेले कार्यक्रम
• सर्वोत्तम स्टोरीटेलिंग कार्यक्रम
• (एक जीवनगौरव पुरस्कार निवड समितीकडून निश्चित केला जाईल)
निवड प्रक्रिया रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ, कलाकार, अभ्यासक यांच्या समितीमार्फत पार पडणार आहे.
सांगीतिक कार्यक्रम व संवाद
कार्यक्रमात रेडिओ विषयक गाणी, किस्से, आणि संवाद सादर करण्यात येणार आहेत. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, आणि संजीवनी भेलांडे यांचे सादरीकरण तर ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र सूत्रसंचालन करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओ निवेदकांशी संवाद साधणार असून, कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. सन्मानिका १९ जूनपासून सांस्कृतिक कार्य संचालनालयात उपलब्ध असतील.
रेडिओचे कालातीत योगदान
१९२७ पासून रेडिओने देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आज महाराष्ट्रात AIR ची २८ केंद्रे, FM रेडिओची १६ केंद्रे, आणि ५४ कम्युनिटी रेडिओ केंद्रे कार्यरत आहेत. विविध FM चॅनेल्स आणि कम्युनिटी रेडिओने मराठी भाषेच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली आहे.
मराठीसाठी राखीव पुरस्कारामुळे या महोत्सवात मराठी भाषेच्या प्रसाराला चालना मिळणार असून, हा उपक्रम रेडिओच्या माध्यमातून राज्य सरकारच्या योजनांच्या प्रचारासाठीही प्रभावी ठरणार असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.