२१ जून रोजी आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ सोहळा; आशा भोसले, सुदेश भोसले यांची उपस्थिती
मुंबई: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिल्या ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’चे आणि ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील सभागृहात हा कार्यक्रम दुपारी २ वाजता पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पाच प्रसिद्ध रेडिओ जॉकी –
आरजे सिद्धू (रेड एफएम), आरजे अक्की (मॅजिक एफएम), आरजे अर्चना (रेडिओसिटी), आरजे प्रेरणा (रेडिओ मिर्ची), आणि आरजे अभिलाष (बिग एफएम) – हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. कार्यक्रमाचे समन्वयक हेनल मेहता तर सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत.
१२ विभागांमध्ये रेडिओ गौरव पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
‘आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार’ हा संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणार असून इतर पुरस्कार नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात आले आहेत. पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह, शाल व भेटवस्तू असे असणार आहे.
पुरस्कारांचे गट पुढीलप्रमाणे:
• आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र
• महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम
• महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम
• महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक
• महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक
• महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक
• महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट मराठी निवेदक
• महाराष्ट्र आशा सर्वोत्तम सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम
• आशा सर्वोत्तम मराठी सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रम
• आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम
संगीत सादरीकरणांतून रेडिओच्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रेडिओ केंद्रस्थानी असलेली लोकप्रिय गाणी, चित्रपटातील रेडिओ पार्श्वभूमीवरील गाणी, तसेच गप्पा-गोष्टी व किस्से प्रथितयश कलाकारांच्या सादरीकरणातून सादर करण्यात येणार आहेत.
या सत्रात सुदेश भोसले, श्रीकांत नारायण आणि संजीवनी भेलांडे आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सर्व रेडिओप्रेमींनी आणि संगीतरसिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.