दुप्पट मताधिक्याने मिळवलेला पोटनिवडणुकीतील विजय म्हणजे देशभरातील आम आदमी पार्टीच्या पुनरागमनाची चाहूल!
पुणे – देशभरात आज पार पडलेल्या पाच पोटनिवडणुकांच्या निकालांमध्ये आम आदमी पार्टीने लक्षवेधी कामगिरी करत दोन महत्त्वाच्या मतदारसंघांत विजय मिळवला आहे. गुजरातमधील विसावदर (जि. जुनागड) येथून गोपाल इटालिया यांनी १७,५८१ मताधिक्याने, तर पंजाबमधील लुधियाना येथून संजीव अरोरा यांनी १०,५४८ मतांनी विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही जागांवर आपला उमेदवार पूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट मताधिक्याने विजयी झाला आहे. या निवडणुकांमध्ये तिरंगी व चौरंगी लढती होत्या. गुजरातसारख्या भाजप बालेकिल्ल्यात, जिथे यापूर्वीचे आमदार भाजपाच्या ऑपरेशन लोटसला बळी पडले होते, तिथे पुन्हा आम आदमी पार्टीचा उमेदवार निवडून येतो, ही बाब जनतेच्या विश्वासाचे द्योतक ठरते. विसावदरमध्ये काँग्रेसने आपविरोधात उमेदवार उभा केला होता, तरीही आपने विजय मिळवला.
पंजाबमध्येही भाजप, काँग्रेस व अकाली दलाच्या उमेदवारांविरुद्ध संजीव अरोरा यांनी दमदार लढत देत यश संपादन केले. या विजयामुळे पंजाबमधील आप सरकारच्या कामगिरीबद्दल जनतेत समाधान असल्याचे अधोरेखित झाले आहे.
आम आदमी पार्टी ही देशातील वेगाने विस्तारणारी राजकीय ताकद बनली आहे. विरोधकांनी वेळोवेळी ‘आप’चा अस्त झाल्याचे भाकीत केले, तरीही पक्षाने पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे.
महाराष्ट्रातही उत्साहाचं वातावरण
गुजरातमधून विजयी झालेले गोपाल इटालिया हे महाराष्ट्राचे सहप्रभारी आहेत. त्यामुळे या विजयानंतर महाराष्ट्रातील आप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा संचारली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या लाटेचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी आपच्या कामाला व विचारधारेला पाठिंबा दिला, हेही प्रकर्षाने जाणवले.
पुण्यात विजयोत्सवात जल्लोष
विजयानंतर पुण्यात छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्थानकाजवळील आप मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व ढोल-ताशांवर नाचत विजयोत्सव साजरा केला.
या वेळी आप महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, अमित म्हस्के, किरण कद्रे, अक्षय शिंदे, रविराज काळे, श्रद्धा शेट्टी, शंकर थोरात व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.