मुंबई – राज्यातील महायुती सरकारच्या आर्थिक कारभारावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय शिस्तीचा पूर्ण अभाव असून, महायुतीच्या सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात आर्थिक बेशिस्त शिगेला पोहोचली असल्याचा आरोप त्यांनी केला.
सावंत यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होऊन केवळ काही महिने झालेत, तरी देखील आता पुन्हा ₹57 हजार कोटींहून अधिकच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या जात आहेत. यावर्षी एकूण पुरवणी मागण्यांचा आकडा अडीच लाख कोटींच्या घरात पोहोचला आहे. हे चित्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिसत आहे. मग अशा परिस्थितीत वार्षिक अर्थसंकल्पाला काही अर्थच उरत नाही.”
त्यांनी यावरून अर्थमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादा आर्थिक शिस्तीचे प्रणेते मानले जात होते. बजेटमध्ये काटेकोर नियोजन आणि कडक अंमलबजावणी करत असत. पण आता त्याच अजितदादांचा आवाज या सरकारमध्ये कुठे हरवला? शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पाला अर्थ विभागाचा विरोध असूनही मंजुरी मिळते, मग अर्थमंत्र्यांचा निर्णय प्रभावहीन ठरत आहे का?” असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणतात, “जर अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणीही पुरवणी मागण्या आणायच्या असतील, तर अर्थसंकल्पाचा औचित्यच काय? आकडे, चर्चा, योजना या केवळ देखावा बनून राहतात.”
सावंत यांच्या या टीकेमुळे महायुती सरकार आणि विशेषतः अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अर्थविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विधिमंडळात येत्या काही दिवसांत यावर जोरदार राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे.