By योगेश त्रिवेदी
मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कर्मचारी सौ. स्नेहल मसूरकर या १० वर्षांच्या सेवा पूर्ण करून निवृत्त झाल्या. या निमित्ताने पत्रकार संघातर्फे आयोजित कौटुंबिक निरोप समारंभात विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि पत्रकार संघाच्या वैभवशाली वाटचालीचे स्मरण करून दिले.
स्नेहल मसूरकर यांनी आपल्या सेवाकाळात संघप्रती जबाबदारीनं कार्य करत निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या कार्यतत्परतेमुळेच या समारंभाला संपादक, पत्रकार, त्यांच्या सहकारी, आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या गौरवासाठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी आणि विश्वस्त मंडळातर्फे १५ हजार रुपयांचा सन्मान निधी प्रदान करण्यात आला.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्नेहल मसूरकर यांनी त्यांच्या सेवेत संपूर्ण प्रामाणिकपणा ठेवला. त्या निवृत्त झाल्या असल्या तरी त्यांचा अनुभव आणि योगदान याचा लाभ पत्रकार संघाला पुढेही मिळणार आहे. कार्यकारिणीने त्यांना भविष्यातही संघाच्या कामकाजात सहभागी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”
स्नेहल मसूरकर यांनी भावुक होत आपल्या भाषणात म्हटले की, “पत्रकार संघाच्या एक महिला कर्मचारी म्हणून मला नेहमी मान, आदर, सन्मान आणि आपुलकी मिळाली. आज झालेला हा निरोप समारंभ माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अध्यक्ष संदीप चव्हाण व कार्यकारिणीने दिलेला सन्मान मी आयुष्यभर विसरणार नाही.”
या समारंभास अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, प्रसाद मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, दीपक म्हात्रे, विजय तारी, प्रदीप कोचरेकर, सदानंद खोपकर, सदस्य राजेश माळकर, राजेंद्र साळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.