मुंबई – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे गिरगाव चौपाटीवरील समाधीस्थळ ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करून त्याचे ‘स्वराजभूमी’ असे नामकरण करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
आ. प्रभू म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या अंत्यसंस्कारासाठी गिरगाव चौपाटीचे मैदान निवडण्यात आले होते, आणि त्याच ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. हे स्थान केवळ ऐतिहासिक नाही, तर तेथील ऊर्जा आणि प्रेरणा आजही राष्ट्रवाद जागवणारी आहे.
मुंबई महापालिकेने 18 ऑगस्ट 2011 रोजी एकमताने ठराव संमत करून या स्थळाला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस शासनाकडे केली होती. त्यानंतरही हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 2015 मध्ये शासन निर्णय जाहीर झाला, तरीही स्मारकाचा दर्जा आणि स्वराजभूमीचे नामकरण अद्याप झालेले नाही, हे अत्यंत दुर्दैवी व अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक स्थळाचा गौरव राखण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला योग्य न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.