मुंबई – शेतकऱ्यांबाबत केलेल्या विवादित वक्तव्यानंतर चर्चेत आलेले माजी मंत्री व भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या बोलण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
मंत्री शंभुराज देसाई यांच्या विधेयक सादरीकरणानंतर बबनराव लोणीकर उभे राहिले आणि शेतकऱ्यांबाबत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. त्याच वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्याला आक्षेप घेतला. यावेळी विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधी बाकावरील सदस्य उभे राहून “माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा” अशा घोषणा देऊ लागले.
गदारोळातही लोणीकर म्हणाले, “मी पंचवीस वर्षे शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलो आहे. मी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत असेन. मी कुणाची माफी मागणार नाही. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर हजार वेळा माफी मागतो, पण माझा हेतू शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता.”
मंत्री शंभुराज देसाई यांनीही स्पष्ट केले की, लोणीकर यांचा उद्देश शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता. त्यांचे वक्तव्य मोडून-तोडून दाखवले गेले आहे आणि त्याचे राजकीय भांडवल होऊ नये, असे ते म्हणाले.
मात्र, विरोधी सदस्य मागे हटत नव्हते. याचदरम्यान भाजप आमदार योगेश सागर यांनी विरोधकांना लक्ष्य करत “देश के गद्दारों को” अशी घोषणा दिली. यावरून वातावरण अधिकच तापले आणि सत्ताधारी व विरोधी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजीसाठी जमा झाले.
या गोंधळामुळे पिठासीन अधिकारी समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याची घोषणा केली.