मुंबई – राज्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, यासाठी ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ या ॲप्सद्वारे पूर्वसूचना दिली जाते. मात्र नागरिकांपर्यंत ही माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचावी यासाठी नवीन ॲप विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आमदार समीर कुणावार यांनी वीज पडून होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भास्कर जाधव, संतोष दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनीही सहभाग घेतला.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पावसाळ्याच्या काळात शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना वीज पडण्याचा अधिक धोका असतो. मुसळधार पावसात वीज कोसळणे व वादळी परिस्थितीमुळे अनेकदा गंभीर घटना घडतात.
या पार्श्वभूमीवर भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) विकसित केलेले ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ हे दोन्ही ॲप्स ४० किलोमीटरच्या परिसरात वीज पडण्याची पूर्वसूचना देतात. राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत या ॲप्सचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.
महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन मध्ये वीज पडून 236 जणांचा मृत्यू झाला, सन मध्ये हा आकडा 181 वर आला.
ते म्हणाले की, अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना शासन आपत्ती मदत निकषांनुसार 4 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देते, तसेच गंभीर जखमींनाही मदत केली जाते.
नवीन ॲप विकसित करून अधिक अचूक व तत्काळ सूचना देण्याची प्रणाली उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याद्वारे भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.