मुंबई – पुण्यातील दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या विशेष लेखापरीक्षणात २२ अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी अद्याप सेवेत असून उर्वरित सात जण सेवानिवृत्त झाले आहेत. दोषी ठरलेल्या १५ कर्मचाऱ्यांवर मासिक वेतनाच्या १० टक्के कपात करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली.
भाजप आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या प्रकरणावर सरकारचे उत्तर मागितले होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, “दापोडी भांडार खरेदी प्रकरणात विशेष लेखा परीक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता का?”, “लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इतर ठिकाणीही अनियमितता आढळून आली आहे का?”, आणि “माजी महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) यांच्याविरोधातही चौकशी सुरू आहे का?”, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
या प्रश्नांना उत्तर देताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “दापोडी, पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळा तसेच चिकलठाणा, संभाजीनगर आणि सातारा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या वरिष्ठ भांडार अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून करण्यात येणार आहे. गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून, सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
या कारवाईमुळे एसटी महामंडळातील भांडार आणि खरेदी विभागातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.