मुंबई/दिल्ली – महाराष्ट्रात भाजप युती सरकारकडून आणला जात असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू असून, ब्रिटिशांनी १९१९ मध्ये आणलेल्या रौलेट कायद्याचेच हे नवस्वरूप आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा कायदा फडणवीस सरकारचा लोकशाही विरोधी डाव असल्याचे ठामपणे सांगितले.
“शहरी नक्षलवाद” हे फक्त बहाणा असून, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, पुरोगामी विचारवंत, लेखक, समाजसुधारक, वारकरी संप्रदाय, आंबेडकरी विचारसरणीचे लोक यांना लक्ष्य करण्यासाठी हा कायदा वापरण्यात येणार आहे, असा आरोप त्यांनी केला. “येत्या काळात संत तुकाराम, ज्ञानेश्वर, गांधीजी, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना देखील ‘शहरी नक्षलवाद’ ठरवले जाईल,” असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
महात्मा गांधी यांच्या पुण्यातील पुतळ्यावर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना त्यांनी म्हटले, “गांधीजींच्या विचारांचा अजूनही काही विचारधारेवर प्रभाव आहे, म्हणूनच त्यांच्यावरील टोकाचा विरोध आजही सुरूच आहे. ही संघ-भाजपने पेरलेल्या विषवल्लीचीच फळे आहेत.”
मराठीवरील अन्याय, हिंदी सक्तीवर बोलताना सपकाळ म्हणाले, “संघाची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे मातृभाषेचा पुरस्कार करायचा, आणि दुसरीकडे हिंदी-हिंदुत्व-हिंदूराष्ट्रचा अजेंडा राबवायचा. हे चालणार नाही. महाराष्ट्र हा गांधी, फुले, आंबेडकरांचा आहे – ‘बंच ऑफ थॉट’वाल्यांचा नाही.”
“जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे. तो हाणून पाडण्यासाठी आम्ही लढा देऊ,” असे सांगत त्यांनी सर्व विरोधी पक्ष व जनतेला या कायद्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.