मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद सदस्य आणि हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यावर सभागृहाच्या पटलावर खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर जबरदस्त पलटवार केला आहे. हक्कभंगाची नोटीस ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत अंधारे यांनी एकाच वेळी लाड यांच्या खोटेपणावर, सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीवर आणि भाजपच्या भूमिकेवर टीका केली.
अंधारे यांनी प्रसाद लाड यांना उद्देशून म्हटले की, हक्कभंगाची नोटीस बजावणं हा तुमच्या प्रक्रियेचा भाग असू शकतो. ती नोटीस आलीच तर तिचं उत्तर देण्यासाठी मी पूर्ण तयार आहे. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा सभागृहाची दिशाभूल करताना तुम्ही खोटी माहिती दिलीत आणि तुमचा हेतू केवळ कायद्याची प्रक्रिया पार पाडणे नसून, मला अडचणीत आणण्याचा आहे, हे स्पष्ट होतं.
त्यांनी प्रसाद लाड यांना थेट सवाल केला की, तुम्ही सांगताय की नोटीस पाठवली ती योग्य पत्त्यावर होती आणि तिथे मी आढळून आले नाही. मग सांगा ना स्पष्टपणे, कोणत्या पत्त्यावर ती पाठवली होती? भीमा कोरेगाव प्रकरणापासून ते बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांपर्यंत सगळ्यांना माझा पत्ता माहीत आहे. मग चुकीच्या पत्त्यावर नोटीस पाठवणं ही चूक माझी की तुमच्या यंत्रणेची?
तसेच त्यांनी सवाल उपस्थित केला की, एक सामान्य नोटीस पोचवण्यासाठी तुम्हाला चक्क गुन्हे शाखेची आठ जणांची टीम का पाठवावी लागली? सामान्य पत्र पोस्टाने, एखाद्या कर्मचाऱ्याने, की स्थानिक पोलिसांमार्फतही पोचवता आलं असतं. मग हे ‘मुंबईहून स्पेशल टीम’ पाठवणं कोणत्या प्रक्रियेत बसतं?
तीव्र शब्दांत उत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, माझा सख्खा भाऊ नोटीस घ्यायला तयार होता, वकिलांनीही पुढाकार घेतला, तरीही नोटीस न देणं म्हणजे मुद्दाम दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. आणि जर हक्कभंगासाठी एक पोलीस पुरेसा असेल, तर चक्क आठ जणांच्या पथकाची काय गरज होती?
त्यानंतर त्यांनी भाजप आणि लाड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला – तुमचा हेतू माझ्यावर दबाव टाकण्याचा होता. पण मला ईडीची भीती नाही आणि लाचखोरीच्या कोणत्याही प्रकरणांत माझे कुटुंबीय अडकलेले आम्ही म्हणून त्यांना वाचवण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या दबावाच्या तंत्राला मी कधीच घाबरणार नाही.
त्या पुढे म्हणाल्या, “मी कायद्याचा आदर करणारी व्यक्ती आहे कारण तो कायदा माझ्या बापाने – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी – लिहिलेला आहे.”
प्रसाद लाड यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आत्मियतेवरही त्यांनी टोकाची टीका केली. 27 वर्षांपूर्वीच्या अस्पष्ट व्हिडिओवरून माझ्यावर टीका करायचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे. ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खुद्द जाहीरपणे म्हणतात की ‘शिवसेना संपवणं आमचा उद्देश आहे,’ त्याच पक्षाचे लोक आता बाळासाहेबांविषयी बोलतात, ही निव्वळ ढोंगबाजी आहे.
शेवटी त्यांनी राज्याच्या जनतेला उद्देशून म्हटले की, “हा सर्व प्रकार हक्कभंगाच्या नोटीसच्या आडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि सभागृहात खोटी माहिती देऊन विरोधकांना अडचणीत आणण्याचे भाजपचे नियोजित तंत्र आहे. मात्र मी या दबावांना भीक घालणाऱ्यांपैकी नाही.”