मुंबई – कल्याणमधील गोळवली परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर व प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे असलेली, पण एका बिल्डरकडून बळकावलेली जमीन अखेर मूळ वारसांना परत करण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले की, भूमाफियांनी या जमिनीवर अनधिकृतपणे ‘तनिष्का रेसिडेन्सी’ नावाची इमारत उभारली असून, त्यावरील कारवाईबाबत माहिती द्यावी.
उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, “या प्रकरणात महापालिका प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले होते की, ही जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाव्यतिरीक्त अन्य कुणीही वापरू शकत नाही. तसे झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, ललित महाजन आणि तनिष्का रेसिडेन्सीने ही जमीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली होती. त्यावर ७२ सदनिका आणि ८ व्यावसायिक गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम उभारण्यात आले होते. ही संपूर्ण जमीन रिकामी करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून, ती जमीन आता प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे नोंदवली गेली आहे.
“इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होईपर्यंत महापालिकेने काय पाहिले नाही? हा प्रश्न गंभीर असून, यातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही बावनकुळे म्हणाले. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. जेव्हा हे बांधकाम झाले, त्या वेळी महापालिका आयुक्त कोण होते, हेही तपासले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेत आमदार योगेश सागर आणि नितीन राऊत यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.