फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
मुंबई – महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीने कडवट भूमिका घेत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि संविधान धोक्यात येणार आहे, असा ठपका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठेवला आहे.
“हे विधेयक म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर हा थेट हल्ला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयात लढा देणार आहोत,” असे आंबेडकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
“हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून, संविधानाच्या मूळ तत्त्वांना छेद देणारे आहे. त्यामुळे आम्ही घटनात्मक मार्गाने विरोध करत राहू,” असे ते म्हणाले.
“जय फुले. जय शाहू. जय भीम. जय महाराष्ट्र. जय संविधान. जय भारत.” या घोषणांनी वंचित बहुजन आघाडीने आपल्या भूमिका अधिक स्पष्टपणे अधोरेखित केली.
हे विधेयक विधानसभेच्या निवड समितीकडे पाठवले गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपली हरकत सादर केली होती आणि विधेयक मागे घेण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्रात या विधेयकावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या विरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.