ठाणे –पत्रकार अधिस्वीकृतीसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी, अशी मागणी माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली आहे. “कोट्याच्या मर्यादेमुळे पात्र पत्रकार अधिस्वीकृतीपासून वंचित राहत आहेत, हे अन्यायकारक आहे,” असे ते म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या “पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” या कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ही कार्यशाळा विविध पत्रकार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय व ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

भुजबळ म्हणाले, “शासनाच्या विविध योजना – जसे आरोग्य, गृहनिर्माण, प्रवास सवलती, जाहिरात धोरण इ. लाभ घेण्यासाठी अधिस्वीकृती अनिवार्य आहे. त्यामुळे पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रे वेळच्यावेळी अद्ययावत ठेवावीत.”
त्यांनी करार पद्धतीत कार्यरत पत्रकारांना 1955 च्या श्रमिक पत्रकार कायद्यातील संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या कार्यशाळेत “माध्यमभूषण” या त्यांच्या आगामी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यशाळेस ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, आणि सन्माननीय वक्ते यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेत ऑर्गोनॉमिक्स एक्स्पर्ट डॉ. मोना पंकज व पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी प्रेरणादायी सत्र घेतले. चर्चासत्र व अनुभव कथनामुळे संवादाची सकारात्मक संधी निर्माण झाली.
ही कार्यशाळा केवळ माहितीपर न राहता, पत्रकारिता आणि प्रशासन यांच्यातील संबंध वृद्धिंगत करणारी आणि व्यावसायिक विकासाला चालना देणारी ठरली, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.