मुंबई : विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज जोरदार गदारोळ झाला. सत्तारूढ भाजप सदस्यांनी “आम्हालाही बोलायची संधी मिळत नाही” असा आक्षेप घेत अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली.
दोनतासांच्या कामकाजात जवळजवळ दीड तास औचित्याच्या मुद्द्यांसाठी दिला गेला. मात्र, हात वर करूनही सत्ताधारी सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही, यावरून अस्वस्थता निर्माण झाली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “सत्ताधारी बाजूला संख्येच्या प्रमाणात बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे, अन्यथा मतदारसंघात जनतेला काय उत्तर द्यायचं?” असा सवाल केला.
ज्येष्ठ भाजप आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सदस्यांनी आक्षेप घेत अध्यक्षांच्या आसनासमोर गदारोळ केला. अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सत्ताधारी सदस्यांची समजूत काढली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या वेळी “विरोधी पक्ष आमदारांना निधी दिला जात नाही, एकही पैसा दिला नाही, हे कुठले धोरण?” असा संतप्त सवाल केला.
त्यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिलं की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारमध्ये सर्वांना न्याय मिळाला. मात्र २०१९ ते २०२२ दरम्यान विरोधी आमदारांना निधी न देण्याचे आदेश अर्थमंत्र्यांना होते.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी “पिठासीन अधिकारी अध्यक्षांच्या भूमिकेत असतात, त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाने दबाव आणणे चुकीचे आहे,” असा टोला लगावला.
अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आसनावर येत पुढील कामकाज पुकारले.