मुंबई : राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिडा विभागाला दिले आहेत. आज दहीहंडी समन्वय समितीने मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
महाराष्ट्र शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या खेळात गोविंदांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा कवचाची गरजही वाढली आहे.
सध्या 75,000 गोविंदांना विमा कवच मिळते. यामध्ये वाढ करून 1,50,000 गोविंदांना विमा कवच देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत क्रिडा विभागाला आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश दिले.
दुर्दैवाने गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचा विमा, अपघात झाल्यास 5 लाख, गंभीर जखमी झाल्यास अडीच लाख आणि किरकोळ जखमी झाल्यास 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.