महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखिल भारतीय किसान सभेकडून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना लाल ध्वज झुकवून श्रद्धांजली

मुंबई: स्वातंत्र्यसैनिक, केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) तीव्र शोक व्यक्त केला आहे. १०१ वर्षीय अच्युतानंदन हे भारतीय शेतकरी चळवळीचे एक प्रेरणास्थान होते. त्यांना लाल ध्वज झुकवून अखेरची मानवंदना अर्पण करण्यात आली.

AIKS अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि सरचिटणीस विजू कृष्णन यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “कॉम्रेड व्हीएस हे क्रांतिकारी शेतकरी आणि श्रमिक चळवळीचे ऊर्ध्वयू होते. त्यांचे जाणे हे पक्षासाठी मोठी हानी आहे.”

कॉ. अच्युतानंदन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९२३ रोजी पुन्नप्र (अलाप्पुझा) येथे झाला. लहान वयातच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांनी शिक्षण सोडावे लागले. आर्थिक परिस्थितीने त्रस्त बालपणातच त्यांच्या मनात साम्राज्यवादाविरोधात प्रखर असंतोष तयार झाला. १९४० मध्ये एस्पिनवॉल कंपनीत काम करत असताना त्यांचा ओढा कम्युनिस्ट चळवळींकडे वळला.

कॉ. पी. कृष्ण पिल्ले यांच्या प्रेरणेतून त्यांनी दलित व मागासवर्गीय शेतमजुरांना संघटित करण्याचे काम कुट्टनाड परिसरात सुरू केले. पुन्नप्र-वायलार संघर्षात त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी शासक वर्गाच्या हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवला. पोलीस कोठडीत त्यांनी सहन केलेल्या छळामुळे ते सामाजिक अन्यायाविषयी अधिक जागरूक झाले.

१९५६ मध्ये ते संयुक्त कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीवर, तर १९५८ मध्ये राष्ट्रीय कौन्सिलवर निवडले गेले. १९६४ साली CPI(M) स्थापनेवेळी त्यांनी नेतृत्वाची भूमिका निभावली. १९८० ते १९९१ दरम्यान ते पक्षाच्या केरळ राज्य समितीचे सचिव होते. १९८५ मध्ये पॉलिट ब्युरोवर निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या धोरणांत मोलाचे योगदान दिले.

राजकीय कारकीर्दीत त्यांनी सात वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आणि तीन वेळा विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. त्यांनी पर्यावरण रक्षण, लिंग समानता, ट्रान्सजेंडर हक्क, परिचारिकांना न्याय्य वेतन आणि मुक्त सॉफ्टवेअरचा प्रसार यांसारख्या अनेक मुद्द्यांवर प्रभावी भूमिका घेतली.

२००६ ते २०११ या काळात मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केला. त्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारने भातशेतीसाठी देशातील सर्वोत्तम आधारभूत किंमत लागू केली. नवउदारवादी धोरणांचा त्यांनी प्रखर विरोध केला आणि सहकार चळवळीच्या पुनर्रचनेसाठी शेवटपर्यंत आग्रही राहिले.

कॉम्रेड अच्युतानंदन यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पत्नी के. वासुमती, मुलगी व्ही.व्ही. आशा, मुलगा व्ही.ए. अरुण कुमार आणि कुटुंबीयांप्रती अखिल भारतीय किसान सभेने आपले संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात