पुणे – सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडून बिले न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील असंख्य कंत्राटदारांच्या अडचणींना वाचा फोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. सरकारकडे तब्बल ९० हजार कोटी रुपये थकलेले असून, यासंदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
माने म्हणाले की, राज्यात सुमारे ८० हजार नोंदणीकृत कंत्राटदार असून त्यांच्याजवळ काम करणाऱ्या ३० ते ४० लाख कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लहान कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत. शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ४० हजार कोटी, जलजीवन मिशनचे १२ हजार कोटी, ग्रामविकास विभागाचे ६ हजार कोटी, जलसंपदा व जलसंधारण विभागाचे १३ हजार कोटी, नगरविकास विभागाचे ४२१७ कोटी आणि इतर योजनांचे मिळून एकूण ९० हजार कोटी रुपये थकलेले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
या संदर्भात कंत्राटदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली असून अद्याप सरकारकडून ठोस उत्तर मिळालेले नाही. सरकारकडे सध्या सुमारे १ लाख कोटी रुपये उपलब्ध असतानाही कंत्राटदारांचे बिले न दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असेही माने म्हणाले.
सरकार लाडकी बहिण योजना, स्मारके, पुतळे आणि इतर प्रकल्पांसाठी कोट्यवधींचे कर्ज घेत आहे, पण जे प्रत्यक्षात काम करून देणं अपेक्षित आहे त्यांना मात्र बिले दिली जात नाहीत. हे अमानवी आणि अन्यायकारक आहे, असे सांगताना माने म्हणाले की, अर्थसंकल्पीय मंजुरीशिवाय हजारो कोटींच्या वर्क ऑर्डर दिल्या जात आहेत. हे काम निवडणुकीच्या आधी टक्केवारीसाठी झाले की काय, याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी स्वतः करावी.
सरकार थकलेल्या बिलांच्या आकड्यावर अपारदर्शकता बाळगून कमी रकमेचा दावा करत आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती जनतेसमोर यावी यासाठी श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी, अशी जोरदार मागणी माने यांनी केली. अन्यथा हर्षल पाटीलसारखी दुःखद उदाहरणे पुन्हा घडतील, आणि यास पूर्णपणे जबाबदार सरकार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.